मुंबई / नगर सहयाद्री : लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. पण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीला जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना. महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपकडे ९ जागा मागितल्या असून भाजप केवळ ६ जागा सोडणार असल्याची माहिती समजली आहे.
पण त्याही ६ जागांसाठीही अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे.
राष्ट्रवादीला ६ जागा सोडण्यास भाजप तयार आहे. पण त्यातील २ जागांचे उमेदवार भाजपनं निश्चित केले आहेत. दोन्ही उमेदवार भाजपचे असून ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील. तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा भाजपनं मित्रपक्षाला दिली असल्याची माहिती एका मीडियाने दिली आहे.
भाजपनं राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरुर, परभणी, सातारा आणि धाराशिव या सहा जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यातील सातारा, धाराशिवमध्ये भाजप स्वत:चे उमेदवार देईल. साताऱ्यातून उदयनराजे भोसले, तर धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रविण परदेशींना तिकीट देण्याची तयारी भाजपनं केली आहे. परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना देण्यात येणार आहे. जानकर स्वत:च्या पक्षाच्या जागेवर लढतील अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपसोबत जाऊन काय फायदा झाला, असा प्रश्न नेत्यांना पडला आहे.