ठाणे / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून सध्या महायुतीमध्ये चढाओढ सुरु आहे. अनेक मतदार संघ असे आहेत की ज्याचा तिढा अद्याप सुटेना. ठाणे, कल्याणसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामुळे शिंदे गटात धुसफूस आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले पण मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट होऊ शकली नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा होती. मीडियावर याबद्दल माहिती देण्यात आली होती.
शुक्रवारी मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली. मुख्यमंत्री अज्ञात स्थळी असल्याने तब्बल तीन तास सर्वच मंत्री आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ताटकळत बसावं लागल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत, नाशिक येथील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे ही उपस्थित होते.