महामोर्चा’ लोणावळ्यात दाखल
लोणावळा। नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथून निघालेली मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा शुक्रवारी मुंबईत धडकणार आहे. ही यात्रा मुंबईच्या प्रवेशद्वारावर रोखण्याच्या हाचलाची सरकारी पातळीवर सुरू आहेत; परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यात पोहोचली असून मुंबईकडे कूच केले आहे. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री ८.३० वाजता होणार होता. मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल १० तासांहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभास्थळी पोहचण्यास सकाळचे ६.४५ वाजले. मात्र सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता. लाखोंच्या संख्येने मराठा समाज त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी थांबले. सभास्थळी येणार्या प्रत्येक बांधवाची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, चहाची व्यवस्था केली जात होती. परिसरात अस्वच्छता होऊ नये याकरिता स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली होती. थंडी जास्त असल्याने ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
मुंबई-पुणे ‘एस्प्रेस वे’ला छावणीचे स्वरुप
मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक आपल्या वाहनांनी मुंबईकडे येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. लोणावळ्याकडून मुंबईकडे येत असताना मुंबई-पुणे ‘एस्प्रेस वे’ने प्रवास न करता जुन्या मुंबई-पुणे हाय वेने यावे, असे आवाहन पोलिसांनी जरांगे पाटील यांना केले होते. जरांगे यांनी त्यास प्रतिसाद दिला. मात्र तरीही काही आंदोलक मुंबई-पुणे एस्प्रेस वेने येण्याची शयता गृहित धरून एस्प्रेस वेवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबई-पुणे एस्प्रेस वेच्या एंट्री आणि एझिट पॉइंटवर रॅपिड अॅशन फोर्स आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात केले आहे. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप आले आहे.
आझाद मैदानात स्टेजच्या बांधकामास सुरूवात
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत पोहचणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात स्टेज बांधण्याचे काम सुरु झाले आहे. आता सरकारने जर फसवा फसवी केली तर मराठा आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.