spot_img
अहमदनगरAhmednagar: चेहरे बदलले; माता भगीनींच्या सुरक्षेचे काय?

Ahmednagar: चेहरे बदलले; माता भगीनींच्या सुरक्षेचे काय?

spot_img

साद-पडसाद। सुहास देशपांडे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बदल्यांची प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विविध खात्यातील विशेषतः महसूल आणि पोलीस खात्यातील बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांत नवे चेहरे आले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि त्यात प्रामुख्याने माता भगीनींच्या सौभाग्याचे लेणं असलेले मंगळसूत्र ओरबाडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यंत गंभीर आणि तेवढाच संतापदायक असलेल्या या प्रकाराकडे सध्यातरी पोलीस हतबलतेने पहात आहेत. बदललेल्या चेहर्‍यांकडून माता भगीनींचे हे सौभाग्याचे लेणं वाचविण्यासाठी ठोस प्रयत्न होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणही मोठे आहे. चोर्‍या, दरोडे, खून, अत्याचार, मारामार्‍या, खुनी हल्ले हे प्रकार सर्रास घडत आहेत. नव्या सामाजिक समिकरणात हेवेदावे वाढून वातावरणात तणावही निर्माण होत आहे. सर्वच ठिकाणी पोलीस पुरतील अशातला भाग नाही. मात्र गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची अत्यावश्यकता आहे. या सर्व गुन्हेगारीत गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या चैन स्नॅचिंगचे (धूम स्टाईल) प्रमाण कमालीचे वाढले आहे. महिलांना रस्त्यावरून फिरणे यामुळे धोक्याचे झाले आहे.

वेगाने येणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र, गंठण, चैन ओढणे आणि हाती आले तेवढे घेऊन तेवढ्याच वेगाने धूम ठोकणे, असा या चोरीचा प्रकार असला तरी ही क्रुरता एवढ्यावरच थांबत नाही. दुचाकीवरील महिला एकतर वाहन चालवत असते किंवा मागे बसलेली असते. बेसावध असलेल्या महिलेच्या बाबतीत ज्यावेळी असे प्रकार घडतात त्यावेळी त्या प्रचंड घाबरतात. त्यामुळे वाहनावरून पडून गंभीर दुखापत किंवा दुर्दैवाने जीव देखील जाऊ शकतो. मात्र चैन स्नॅचरसाठी फक्त चोरी करणे, एवढेच उद्दीष्ट असते.

एकदा ओरबाडण्याचे काम झाले की तो परत मागे वळूनही पहात नाही. हा प्रकार घडल्यानंतर महिला धक्क्यातून बाहेर येत आरडाओरडा करेपर्यंत तो क्रुरकर्मा निघून गेलेला असतो. गेल्या काही वर्षांपासून हे लोण प्रचंड वाढले आहे. विना नंबर प्लेट किंवा चोरीची वाहने यासाठी वापरली जात असल्याचे पोलिसांचेच म्हणणे आहे. असे असतानाही विना नंबर वाहने बिनदिक्कत फिरतात कसे, हा प्रश्न आहे. एरवी शहरी भागापुरता मर्यादित असलेला धूमस्टाईलचा महारोग आता निमशहरी आणि ग्रामीण भागापर्यंत पसरला आहे.

चोर्‍या, दरोडे, खून प्रकरणांचा तपास काही काळानंतर का होईना लागतो किंवा त्याचे धागेदोरे मिळतात; पण धूमस्टाईल चोरीची उकल होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पोलिसांचे फिरते स्क्वॉड नेमके करते काय, हा प्रश्न आहे. धूमस्टाईलचे प्रकार ठराविक रस्त्यांवर घडतात, यावर नियंत्रण येऊ नये, हे दुर्दैव आहे. सावेडीत गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, पारिजात चौक ते एकविरा चौक, कुष्ठधाम रस्ता या भागात हे प्रमाण मोठे आहे. जिल्ह्यातही असेच काही ठराविक रस्ते आहेत. या भागातून महिलांना एकट्याने पाठविणे कुटुंबासाठी धाडसाचे ठरू लागले आहे. गळ्यातील सोने तर जातेच, पण महिलांच्या जीवाला देखील धोका असल्याने कुटुंब चिंतेत पडत आहे.

मागील आठवड्यात पोलिसांच्या घाऊक बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्यांमध्ये नवीन चेहरे आले आहेत. त्यांना सहकार्य करणारे सहकारी अधिकारी देखील बरेच बदलले आहेत. कनिष्ठ स्टाफ जरी तोच असला तरी त्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांच्याकडून काम करून घेणारा अधिकारी वर्ग नवा असल्याने या नव्या चेहर्‍यांकडून जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला चैन स्नॅचिंगचा प्रकार रोखण्यासाठी त्यांच्याकडून कठोर उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून माता भगीनींना दिलासा देण्याचे मोठे आव्हान या नव्या चेहर्‍यांसमोर आहे.

हे काय गौडबंगाल?
चैन स्नॅचिंगसह अन्य काही चोर्‍यांचा तपास लवकर लागणे दूर, त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आणि फिर्याद देण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. ‘वजनदार’ मंडळींच्या बाबतीत असे काही घडले तर त्याचा तपास अवघ्या काही दिवसात लागतो, मात्र सर्वसामान्यांसाठी ‘तपास सुरू आहे’ हे पालूपद वर्षानुवर्षे ऐकावे लागते. सर्वसामान्यांसाठी असे का होते, हे गौडबंगाल कायम आहे.

महिलांनीही काळजी घ्यावी
पत्ता विचारण्याचा बहाणा, चालता चालता किंवा दुचाकीवर असल्यानंतर गळ्यातील सोने ओरबाडणे, हे प्रकार सातत्याने होत असतानाही सोने घालून घराबाहेर पडणार्‍यांचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. हे सोने आपल्याच जीवासाठी धोकादायक ठरू शकते, याची जाणीव असल्याने महिलांनी याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांची खांदेपालट
४ पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील ४३ पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात ४ पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर १८ पोलीस उपनिरीक्षक आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...