अहमदनगर | नगर सह्याद्री –
तारकपूर येथील हॉटेल सुवर्णम रेसीडेन्सीमधील मॅनेजरने रूम भाड्याचे ग्राहकांनी पाठविलेले एक लाख ६० हजार ७६१ रूपये स्वत:च्या खात्यावर घेऊन पळून गेल्याची घटना समोर आली आहे. कुणाल रामदास वाघ (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात मंगळवारी (दि. ३०) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश नवनाथ धुमाळ (वय ३६ रा. गुलमोहोर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. तारकपूर येथील हॉटेल सुवर्णम रेसीडेन्सीमध्ये येणार्या ग्राहकांवर देखरेख ठेवण्यासाठी १ डिसेंबर २०२३ पासून कुणाल रामदास वाघ याला रिसेशप्सन मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते. तो १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगा आजारी असल्याने गावी जावे लागेल, असे सांगून निघून गेला. दरम्यान त्याच्याकडे ग्राहकांच्या नोंदणीबाबत चौकशी करण्यासाठी संपर्क केला असता त्याने फोन उचलले नाही.
धुमाळ यांना शंका आल्याने त्यांनी हॉटेल लॉजिंग रजिस्टर तपासले असता त्यात कुणाल वाघ याने कामावर असताना त्याच्या हस्ताक्षरात नोंदी केल्याचे दिसून आले. ग्राहकांकडून रूमचे भाडे कुणाल वाघ याने त्याच्या युपीआय खात्यावर घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर धुमाळ यांनी हॉटेल रूमच्या भाड्याचे ग्राहकांनी पाठविलेल्या पैशांचा हिशोब केला असता १ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान एक लाख ६० हजार ७६१ रूपये कुणाल वाघ याने त्याच्या खात्यावर घेतल्याचे समोर आले आहे.