spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसला झटका : नागवडे पती-पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर!; आ. लंके यांनी फुंकले रणशिंग...

काँग्रेसला झटका : नागवडे पती-पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर!; आ. लंके यांनी फुंकले रणशिंग…

spot_img

काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच पती-पत्नी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष | दोघे मिळून करणार का बाळासाहेब थोरात यांचा विश्वासघात?
सारिपाट / शिवाजी शिर्के –
काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते कालपर्यंत देशातील कोणत्याही जिल्ह्यात पती-पत्नी एकाचवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी विराजमान करण्यात आले नाहीत. मात्र, नगर जिल्ह्यात ती किमया फक्त आणि फक्त बाळासाहेब [MLA Balasaheb Thorat] थोरात यांनी घडवून आणली आणि राजेंद्र नागवडे [Rajendra Nagwade ] यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी तर त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा नागवडे यांची काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड केली. अर्थात, त्याआधी हेच नागवडे काँगे्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झाले होते. तरीही काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. मात्र, या दोघांचे मन श्रीगोंद्याच्या बाहेर कधीच रमले नाही. आता दोघांनाही गळाला लावण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार [DCM Ajit Pawar]  यशस्वी झाले असल्याचे आणि त्यातूनच अनुराधा नागवडे या अजित पवार गटाच्या श्रीगोंद्यातील उमेदवार असणार असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. नावगडे पती-पत्नींवर ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रचंड विश्वास! मात्र, असे असतानाही हेच नागवडे दाम्पत्य आता काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार यांच्या गोटात दाखल होत आहे. दहा-बारा दिवसात प्रवेशाचा मोठा बार उडणार असल्याने त्याआधी नगरच्या काँग्रेसची डागडुजी करण्याची नामुष्की थोरात यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर येणार आहे.

काँगे्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर नगर जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. बाळासाहेब थोरात आणि शिवाजीराव नागवडे या दोघांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही कंबर कसत पक्षाची बांधणी केली आणि जिल्ह्यात काँग्रेसला वेगळे स्थान निर्माण करुन दिले. मध्यंतरीच्या कालावधीत शिवसेनेत दोन गट पडले आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीतही! शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्याचे फारसे परिणाम नगर जिल्ह्यात दिसून आले नाही. नगर शहराचा अपवाद वगळता शिवसेनेचे तसेही वेगळे आणि स्वतंत्र अस्तिव्व नेवासा-पारनेरचा अपवाद वगळता कोठेही प्रभावीपणे आजही जाणवत नाही. नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांची स्वतंत्र यंत्रणा आणि ताकद आहे. म्हणजेच गडाख हाच एक स्वतंत्र व्यक्तीकेंद्रीत पक्ष आहे. शिवसेनेचा एकमेव आमदार राहिलेल्या पारनेर मतदारसंघात विजय औटी सलग तीनवेळा निवडून आले. मात्र, शिवसैनिकांसह कार्यकर्त्यांना कायम तुच्छेतेची आणि अपमानास्पद वागणूक देण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांना भोवली. त्यातूनच जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची धमक आणि कुवत असतानाही त्यांच्या विरोधात शिवसेना शाखाप्रमुखापासून ते संपर्कप्रमुखापर्यंत सारेच गेले.

विधानसभेत औटी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर ते जवळपास अज्ञातवासात गेले. बाजार समिती सारख्या सहकारातील निवडणुकीत त्यांनी त्यांना पराभूत करणार्‍या नीलेश लंके यांच्या दावणीला तालुक्यातील संपूर्ण शिवसेना बांधली. लंके हे आमदार होण्याआधी शिवसेनेचे तालुकाप्रमुख होते. आपसुकपणे त्यांनी औटी यांच्या संपर्कातील कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी गळाला लागले आणि त्याचे त्यांनी सोने केले. याच निवडणुकीत औटी स्वतंत्र लढले असते तर त्यांचा कार्यकर्त्यांचा संच कायम राहिला असता. औटी यांनी याच बाजार समितीत लंके यांच्या गळ्यात गळा घातला असताना येथे सुजय विखे यांना तब्बल ४५ टक्के मते मिळाली. पारनेरमधील हीच ४५ टक्के मते आता विखे यांचे भांडवल ठरले आहे.

राजेंद्र नागवडे हे याआधीही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते म्हणून ओळखले जात होते! मात्र, त्यांचे मन कायम रमले ते श्रीगोंद्यातच! श्रीगोंद्याचं आमदार होण्याचं त्यांच अपूर्ण स्वप्न अनुराधा नागवडे यांच्या रुपाने पूर्ण होईल, असे त्यांना वाटते. श्रीगोंदा मतदारसंघात काँग्रेसची स्वतंत्र ताकद नाही. नागवडे म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच नागवडे असे येथील समिकरण! कोणत्याही राजकीय पक्षात गेलो तरी ही आपली गठ्ठा मतं आपल्या सोबत कायम राहणार असल्याची खात्री नागवडे यांना आजही आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्या समर्थकांची साथ मिळाली तर ही बेरीज वाढेल आणि त्यातून आपला विधानसभेचा मार्ग मोकळा होईल अशी खात्री नावगडे यांना वाटू लागली आहे. त्यामुळेच मध्यंतरी स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागवडे यांनी बाळासाहेब थोरात यांना ‘टाटा’ करत राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित केले आणि श्रीगोंद्यात शक्तीप्रदर्शन केले. अजित पवार यांच्या उपस्थितीतील हा कार्यक्रम आणि त्याची नेटकी तयारी नावगडे पती-पत्नी आणि त्यांच्या समर्थकांनी जोरकसपणे केली. अजित पवार यांनी राजेंद्र नागवडे यांच्या पाठीवर हात टाकत तयारीला लागण्याच्या सूचना लागलीच केल्या आणि त्यातून गेल्या पंधरा दिवसात नागवडे पती-पत्नी अजित पवार यांच्या दरबारात सात-आठ वेळा हजेरी लावून आल्याची चर्चा झडूू लागली आहे.

श्रीगोंद्यातून भाजपाचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आहे. या सत्ता समिकरणात नागवडे अजित पवार यांच्यासोबत गेले तरी त्यांच्यासाठी भाजप जागा सोडेल का, असा प्रश्न चर्चेत आहे. मात्र, प्राप्त राजकीय परिस्थिती आणि राज्यातील सत्तासमिकरणांचा विचार करता मतांची विभागणी आणि नाराजीनाट्य टाळायचे असेल तर लोकसभेनंतर होणारी विधानसभा निवडणूक महायुतीतीतील तीनही राजकीय पक्ष म्हणजेच भाजपा- शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे स्वतंत्रपणेच लढणार हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. लोकसभा निवडणुकीत हे तीघेही एकत्र दिसतील. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला विजयी करण्यासाठी हे तीघेही एकदिलाने काम करणार! मात्र, विधानसभा निवडणुकीत हे तीघेही एकमेकांच्या विरोधात लढणार! निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकत्र येणार आणि ज्याचा उमेदवार जिंकेल त्याचं डोकं मोजत सत्तेच्या पदांची वाटणी होणार हेही त्रिकालाबाधीत सत्य आहे.

श्रीगोंद्यातील राजकारणाचा विचार करता या मतदारसंघात पाचपुते अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपचा उमेदवार असू शकतो. अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे उमेदवार असू शकतात. शिंदे गटाला येथे अद्याप कोणताही चेहरा मिळालेला नाही. महाविकास आघाडीचा विचार करता आघाडीतील बेरजेचे आणि विजयाचे गणित विचारात घेता माजी आमदार राहुल जगताप हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार असणार हे नक्की! महाविकास आघाडी एकत्रित लढण्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे दिसते. तसेच झाले तर राहुल जगताप यांच्याशिवाय येथे आजतरी पर्याय दिसत नाही. तालुक्यातील एकूणच राजकीय कानोसा घेतल्यास जगताप हे कडवे आव्हान उभे करणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.

श्रीगोंदा मतदारसंघाचे काय होणार, याहीपेक्षा काँग्रेसचे राज्यातील नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या विश्वासाने नागवडे पती-पत्नीवर काँग्रेसची मोठी जबाबदारी सोपवली होती. या दोघांनी मिळून थोरात यांचा विश्वासघात केल्यात जमा आहे आणि जोडीनेच जिल्ह्यातील काँग्रेसचा ‘कार्यक्रम’ देखील केलाय. नावगडे पती-पत्नी काँग्रेसला घटस्फोट देण्याआधी त्यांची पक्षातून हकालपट्टी केले जाते का, यासह त्यांच्या जागी पक्षाची धुरा कोणाकडे सोपवली जाते हे पाहावे लागणार आहे.

विजय औटी यांची जिरवली; आता सुजय विखे यांची
जिरवणार म्हणत आ. लंके यांनी फुंकले रणशिंग
पारनेरचे अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके [MLA Nilesh Lanke] यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य सोशल मिडियात चांगलेच व्हायरल होत आहे. आपण डाळ शेंगदाणे वाटणार्‍यातला नाही, असे स्पष्ट करतानाच आ. लंके म्हणाले, ‘मागील निवडणुकीत मी एकाची जिरवली आता दुसर्‍याची जिरवायची आहे’. मागील निवडणुकीत नीलेश लंके यांनी शिवसेनेच्या विजय औटी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. कार्यकर्त्यांवर कायम चिडणारे आणि त्यांचा चारचौघात पानउतारा करणार्‍या विजय औटी यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. त्या नाराजीला हात घालत नीलेश लंके यांनी प्रचारात हाच मुद्दा केला आणि विजय औटी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळेच कालच्या सभेत त्यांनी म्हटल्यानुसार एकाची म्हणजेच विजय औटी यांची जिरवली हे स्पष्ट होत आहे. आता दुसर्‍याची म्हणजचे सुजय विखे [MP Sujay Vikhe] यांची जिरवणार असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले आहे. एकूणच आ. लंके यांनी कालच्या सभेत विजय औटी यांना जसे आपण आडव्या हाताने घेतले तसेच यावेळी सुजय विखे यांना देखील आपण लोकसभा निवडणुकीत आडव्या हाताने घेणार असेच सुतोवाच केल्याचे आता मानले जात आहे. संपर्काच्या मुद्यावर उजवे ठरलेल्या नीलेश लंके यांनी त्यामुळेच कालच्या बैठकीत विखे यांच्यासह त्यांचे पीए फोन घेत नसल्याचा आणि आता निवडणूक आली म्हणून संपर्क करत असल्याचा केलेला आरोप येत्या निवडणुकीत विखे विरोधी प्रचाराचा मुद्दा झाल्यास आश्चर्य वाटू नये!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...