अहमदनगर । नगर सहयाद्री
काही दिवसांपूर्वी मोठया थाटात लोकार्पण झालेल्या सोलापूर महामार्गासह बाह्यवळण रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच असून महामार्गावरील काही सर्व्हिस रस्त्यांना अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे महामार्गालगत असणार्या गावातील नागरिकांची तसेच शाळकरी मुलांची हेळसांड होत आहे. महामार्गांवर उड्डाणपूल असणार्या बर्याच गावांतील सर्व्हिसरस्ते पूर्ण झालेले नाहीत. महामार्गावरील साकतखुर्द, शिराढोण याठिकाणी अजूनही एका बाजूचे सर्व्हिस रोड पूर्ण झालेले नाही. यामुळे या गावातील नागरिकांसह शाळकरी मुलांची हेळसांड सुरु आहे.
सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाच्या एसटी बस उड्डाण पुलावरून जात आहेत. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलांना खांद्यावर दफ्तराचे ओझे घेऊन अर्धा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. महामार्गाची कामे अपूर्ण असताना घाईघाईत लोकार्पण सोहळा साजरा केल्याने सोलापूर महामार्गाबद्दल असून अडचण अन नसून खोळंबा या म्हणीचा प्रत्यय येत आहे. दरम्यान अहमदनगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच मोठया थाटात पार पडला. बाह्यवळण रस्त्यासह महामार्गाचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रस्ता उदघाट्नाचा फार्स झाल्याची चर्चा नागरिकांमधून झडू लागली आहे.
गाव एकीकडे अन बसथांबा भलतीकडे
नुकतेच लोकार्पण झालेल्या सोलापूर महामार्गांवर बहुतांश ठिकाणी गावापासून बर्याच अंतरावर बस थांबे बांधण्यात आली आहेत. महामार्गांवरील साकतखुर्द, शिराढोण, वाळुंज, तुक्कडओढा याठिकाणी एका साईडने गाव सोडून बर्याच अंतरावर बसथांबे आहेत. यातील बरीच बस थांबे निर्जन ठिकाणी बांधली आहेत. गाव सोडून भलतीकडे हे बस थांबे का बांधले असावे हे न उलगडणारे कोडे आहे. परंतु यामुळे मात्र प्रवास करणार्या नागरिकांची पायपीट वाढली असून निर्जन ठिकाणी बांधलेल्या बस थांब्यामुळे महिला, तसेच शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढणार आहे.