spot_img
अहमदनगरजुनीच कॅसेट; मुद्देही तेच फक्त भिडू बदलला!

जुनीच कॅसेट; मुद्देही तेच फक्त भिडू बदलला!

spot_img

साडेचार वर्षांपूर्वी पारनेरमध्ये विजय औटींच्या मग्रुरतेचा, श्रीमंतीचा मुद्या मांडला अन् भावला! ‘गरीब विरुद्ध श्रीमंत’ ही लंके यांची दुसर्‍यांदा टॅगलाईन!

शिवाजी शिर्के। ग्राऊंड रिपोर्ट

पारनेरचे तत्कालीन आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पारनेर दौर्‍यावर होते. त्या कार्यक्रमाच्या नियोजनात औटी समर्थकांनी नीलेश लंके यांना बाजूला ठेवले. शिवसेना तालुकाप्रमुख असतानाही आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना डावलले आणि माझ्या कार्यकर्त्यांची औटी समर्थकांनी डोकी फोडली असा कांगावा त्यावेळी नीलेश लंके यांनी केला. प्रत्यक्षात स्वत:च्या हाताने दगड मारुन घेत आपणच आपले डोके फोडून घेतले आणि औटी समर्थकांनी दगडफेक केल्याने आपले डोके फुटले असा कांगावा लंके समर्थकांनी त्यावेळी केला. त्यातून नीलेश लंके यांच्यावर औटी यांनी कसा अन्याय केला यासह औटी यांची मग्रुरीची, उद्धटपणाची वागणूक यातून तालुक्यातील एखाद्या गावात कोणी सुटले आहे काय असा एकच प्रश्न विचारत लंके यांनी मतदारसंघात काढलेल्या संवाद यात्रेत गावोगावी उपस्थित केला. औटी यांच्याकडून दुखावल्या गेलेल्या, अपमान झालेल्या कार्यकर्त्यांची संख्या गावागावात होतीच! औटी यांनी विकास कामांचा मोठा डोंगर उभा केला असतानाही त्यांच्या स्वभावाचे, अपमानास्पद वागणुकीचे मुद्दे मतदारसंघात मांडले गेले आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना हे मुद्दे भावले. आता लोकसभेच्या मैदानात तुतारी घेऊन सज्ज झालेल्या नीलेश लंके यांनी औटी यांच्या विरोधात जे मुद्दे मांडले तेच मुद्दे म्हणजेच तीच कॅसेट वाजविण्यास प्रारंभ केला आहे. विजय औटी तुमचे फोन घेतात का?, ते तुमच्याशी कसे बोलतात? चारचौघात तुमच्या गावातील कोणाचा पानउतारा (अपमान) केला नाही असा माणून दाखवा!, औटींनी प्रत्येक विकास कामात पंधरा- पंधरा टक्केवारी घेतली! सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार होऊ नये अशी त्यांची भावना!, घराणेशाही संपविण्यासाठी मी मैदानात!, मी आमदार झालो तर गावागावात माझ्यासाठी काम करणारे तुम्हीच सारे आमदार!, निवडणुकीसाठी सामान्य जनतेकडून मिळणारी लोकवर्गणी!, रोजंदारीवर जाणार्‍या महिलेने निवडणूक निधीसाठी मंगळसुत्र मोडल्याच्या ‘नियोजनबद्ध’ बातम्या! निवडणुकीसाठी मदत म्हणून शेतकर्‍याने दिली… कांदा, टोमॅटोची पट्टी… असा आशय असणार्‍या सोशल मिडियातील पोस्ट! आता लोकसभेच्या मैदानात नाही… नाही…. म्हणत उतरलेल्या नीलेश लंके यांचे मागील साडेचार वर्षापूर्वीचेच मुद्दे पुन्हा समोर आले आहेत. फरक इतकाच की त्यावेळी समोर भिडू होता विजय औटी आणि आता समोर भिडू आहे सुजय विखे पाटील! साडेचार वर्षानंतर पारनेरकर जर साडेचार वर्षापूर्वीच्या मतदानातील चुकीबद्दलची पश्चातापाची भावना व्यक्त करत असतील तर त्याचे खापरे लंके कोणावर फोडणार हा खरा वास्तववादी प्रश्न आहे.

८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावागावात ठोकलेले भाषण मताधिक्याच्या गणितात ठरणार ४० हजाराचा घाटा
पारनेरमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुक्यात एक वर्षानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या टप्प्यात पारनेरमध्ये झाल्या. आमदारकीचा जोश ठासून भरलेल्या नीलेश लंके यांनी गावागावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना पॅनल तयार करण्यास भाग पाडले. ते एवढ्यावरच थांबले नाही! ग्रामपंचायतीची निवडूणक असतानाही त्यांनी त्या ८२ गावांमध्ये जाऊन सभा घेतल्या आणि समोरचा पॅनल पराभूत करा असं भावनिक आवाहन करताना गावातील प्रत्येक वॉर्डात मी उभा आहे असं समजून मतदान करा असं आवाहन केले. लंके यांच्या सभा आणि भाषणांमुळे गावागावात दोन गट पडले. ते एव्हढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मतदानाच्या शेवटच्या दोन दिवसात गावागावातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोन केले आणि आपल्या कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यातून निकाल लागला आणि ८२ ग्रामपंचातींमध्ये पाडापाडी करण्याचे मोठे काम त्यांनी पार पाडले. समोरासमोर उभे ठाकलेले उमेदवार आज गोडीत झालेले दिसतात. मात्र, माझा पराभव तू केला नाहीस, लंके यांनी केला याची खदखद ते आजही व्यक्त करतात! संधी मिळू दे, लंकेला माझी वॉर्डातील ताकद दाखवतो अशी आव्हानात्मक भाषा त्याचवेळी यातील लंके यांच्यामुळे पराभूत झालेल्या आणि लंके यांच्या विरोधात निवडून आलेल्या दोघांनीही त्याचवेळी वापरली. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार- खासदार लक्ष घालत नसल्याचा पायंडा लंके यांनी मोडीत काढला. आता लंके हे निवडणुकीला उभे राहिले असताना लंके यांच्यामुळे पराभूत झालेले आणि त्यांच्या विरोधात निवडून आलेले अशा सार्‍यांनीच संधीचे सोने करण्याचा उचलेल्या विडा लंके यांच्या पारनेरमधील मताधिक्यातील मोठा अडसर ठरणार आहे. ग्रामपंचायतीच्या वॉर्डात उभा राहिलेला उमेदवार हा किमान १०० मतांचा मालक असतो. ८२ ग्रामपंचायतींमध्ये काही गावांमध्ये सात, नऊ, अकरा, तेरा, पंधरा अशी सदस्य संख्या असली तरी साधारणपणे प्रत्येक ग्रामपंचायीत ९ सदस्य लंके यांच्यामुळे पडलेत असे गृहीत धरल्यास पारनेर तालुक्यात या टप्प्यातील ८२ ग्रामपंचायतींमध्ये ७३८ सदस्य लंके यांच्यामुळे पराभूत झालेत! या ७३८ सदस्यांना घरी बसवले गेले. त्यांची शंभर मतांची ताकद पाहता ७३ हजार ८०० मते ही लंके यांच्या विरोधात जाणार आहेत. या सदस्यांची ताकद ५० मतांची धरली तर ३६ हजार ९०० मते विरोधात जाणार आहेत. याशिवाय त्या- त्या गावात झालेल्या सेवा सोसायट्यांचं गणित आणखीन वेगळेच! आपली मोठी चुक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर वर्षभरापूर्वी झालेल्या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला, सभेला जाणे लंके यांनी टाळले. मात्र, त्याआधी ८२ ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घालून केलेली घोडचूक आता लंके यांच्या समर्थकांकडून मांडल्या जाणार्‍या मताधिक्यातील मोठा अडसर ठरणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.

‘ए…. कलेक्टर….’ ही तर सराईत गुंडाकडून दुसर्‍या सराईत गुंडाला वापरली जाणारी भाषा!
घड्याळासह आमदारकीचा राजीनामा देणार्‍या सुपा येथील जाहीर सभेत मतदारांसह समर्थकांसमोर बोलताना नीलेश लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांबद्दलचा किस्सा सांगताना, ‘ए …. कलेक्टर…’ असं आपण स्वत: जिल्हाधिकार्‍यांना बोलल्याचे जाहीरपणे सांगितले. असं बोललो याचा पुरावाही त्यांनी कार्यकर्त्यांचे नाव घेऊन दिला. जोडीनेच आपण जे बोललो ते बोललो, असं त्यांनी ठणकावून सांगितलं अन् लागलीच मग टाळ्या- शिट्ट्या! पुरोगामी जिल्हा, राज्य असा नामोल्लेख करणार्‍या आणि प्रशासनातील तलाठी- ग्रामसेवकापासून कलेक्टरपर्यंत सार्‍यांना मानसन्मान देत आलेल्या शरद पवार यांचा आजही प्रशासनातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यापासून ते कलेक्टर- एसपी- सीईओ पर्यंतचे अधिकारी मानसन्मान ठेवतात. सत्तेत नसतानाही त्यांच्या शब्दाला त्यामुळेच प्रशासनात मान दिला जातो. आज त्यांच्याच विचाराच्या पक्षाकडून लंके हे लोकसभेची म्हणजेच खासदारकीची निवडणूक करत आहेत. म्हणजेच ते पंचायत समितीची नव्हे तर थेट लोकसभेची उमेदवारी करत आहेत. सराईत गुंडाकडून दुसर्‍या गुंडाला ही असली अरे-तुरेची भाषा वापरली जाते याचे भान ठेवण्याची गरज आहे.

पवारांना बारामतीत सुनेत्रा हव्या असतील तर नगरमधून भाजपला सुजय विखे हवेतच!
बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी उमेदवार जाहीर झाल्या. महायुतीतील हर्षवर्धन पाटील आणि विजयबापू शिवतारे या दोघांनी बंडाचे निशान हाती घेण्याचा निर्णय जाहीर करताच मोठी खळबळ उडाली. या दोघांचेही बंड शांत करण्याचा प्रयत्न होऊनही दोघेही बंडावर ठाम राहिले. याच दरम्यान, अजित पवार यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली अन् पाटील- शिवतारे यांचे बंड शमवले गेले नाही तर महायुतीचे राज्यातील उमेदवार पाडू अशी धमकीच दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी निर्णायक भूमिका घेतली आणि या दोघांचेही बंड शमले. आता या दोघांनीही बारामतीमधून सुनेत्रा पवार याच विजयी होतील अशी जाहीर भूमिका घेतली. बारामतीमधून संभाव्य बंड शमवले जाताच त्या बदल्यात आता भाजपानेही अजित पवार व त्यांच्या समर्थकांकडून अपेक्षा ठेवली नसेल तर नवलच! नगरची जागा भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. राज्यातील भाजपा नेत्यांसह फडणवीसांनाही लंके यांचे बंड खटकले आहे. अजित पवार यांच्या गुडबुकमध्ये असल्याने त्यांनी लंके यांचे चोचले पुरवले. आता तेच लंके महायुतीच्या विरोधात ठाकले आहेत. त्यामुळेच चोचले पुरवलेल्या लंके यांना थोपविण्याची जबाबदारी आपसूकपणे अजित पवार यांच्यावर आल्याचे भाजपातील निकटवर्तीय सांगू लागले आहेत. अजित पवारांना बारामतीत सुनेत्रा पवार निवडून आलेल्या हव्या असतील तर नगरमधून भाजपला सुजय विखे हे मताधिक्याने निवडून आलेले हवे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता अजित पवार यांनी नगरमध्ये लक्ष घातले आहे. नगरमधील मेळाव्यात अजित पवार हे लंके यांचा समाचार घेणार का हे पहावे लागणार आहे.

नाराजी : औटींच्या विरोधात पंधरा वर्षानंतर तर; लंके यांच्या विरोधात अवघ्या साडेचार वर्षात!
पारनेर मतदारसंघात प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची स्वत:ची फळी लंके यांनी उभी केली असून ती कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा लंके यांना व्यक्तीगत माननारी आहे. मात्र, चहापेक्षा म्हणजेच लंके यांच्या पेक्षाही त्यांच्या किटल्या (कार्यकर्ते) जास्त गरम असल्याची चर्चा कायम आहे. हाच मुद्दा लंके यांच्यासाठी दुसरा मोठा अडसर ठरणार आहे. विजय औटी यांच्या विरोधात तालुक्यात नाराजी निर्माण होण्यास आणि त्याचे प्रत्यक्षात जाहीरपणे बंडात रुपांतर होण्यास पंधरा वर्षे लागली. लंके यांच्या विरोधात अवघ्या चार- साडेचार वर्षात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. विरोधी नाराजी किटल्यांमुळे जास्त होतेय याची जाणिव त्यांना झाली असली तरी ते आता कोणत्याही परिस्थितीत या किटल्यांना बाजूला करु शकत नाहीत. अवघ्या साडेचार वर्षात तालुक्यात आपल्या विरोधात वातावरण निर्माण झाले असल्याची नोंद घेतानाच यातून दुरुस्ती करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

रडून, भावनिक होऊन लंके यांनी गमावली मोठी संधी!
साधारणपणे दोन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला नीलेश लंके हे लागले होते. त्यांच्या समर्थकांकडून राणी लंके यांचे नाव ‘भावी खासदार’ या टॅगलाईनने सोशल मिडियावर व्हायरल होत होते. अजित पवार यांना समर्थन दिल्यानंतर शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी करताना तांत्रिक अडचण येणार हे लंके यांच्या दोन वर्षांपूर्वीच लक्षात आले होते. त्यामुळेच त्यांनी राणी लंके यांचे नाव लोकसभेसाठी पुढे करत त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवार यांच्याकडून राणी लंके यांच्या नावास विरोध झाला. विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा न देता हातात तुतारी घेतली तर सहा वर्षे अपात्रतेची कारवाई ठरलेली होती. त्यामुळेच नीलेश लंके यांनी शेवटच्या क्षणापर्यंत दोघांपैकी कोण याचा सस्पेन्स कायम ठेवला. मात्र, शरद पवार यांनी निर्वाणीचा इशारा देताच आमदारकीचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदारकीचा राजीनामा जाहीर करताना नीलेश लंके हे भावनिक होत रडले. खरे तर त्यांनी मतदारांमध्ये ‘हिरो’ होण्याची मोठी संधी गमावली. नागपूरच्या काँग्रेस आमदाराने आमदारकीचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश अगदी जोशात आणि मीच खासदार असणार असं सांगणारा होता. लंके यांना हे सहजशक्य होते. मात्र, आमदारकीत आपण किती गुंतून पडलो आणि आमदारकीची ढाल आता यापुढे असणार नसल्याने किती आणि कोणते परिणाम होणार याची अस्वस्थता त्यांनी दाखवून दिली.

नाकावर टिच्चून तुतारी फुंकलीच!
छत्रपती संभाजी महाराज महानाट्याच्या निमित्ताने नगरमधून नीलेश लंके हे शरद पवार गटाची तुतारी फंकणार असल्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले. काहीही झाले तरी आपण अजित पवार यांना सोडणार नसल्याचे नीलेश लंके हे वारंवार सांगत होते. मात्र, प्रत्यक्षात पडद्याआड जे चालू होते त्यांची बित्तंमबात ‘नगर सह्याद्री’ंच्या हाती येत होती. त्यामुळेच गेल्या सात महिन्यांच्या आधीपासून नीलेश लंके हे फडणवीस- अजित पवार यांना वाकुल्या दाखवत महायुतीच्या विरोधात उमेदवार असणार असल्याचे भाकीत ‘नगर सह्याद्री’ने मांडले होते आणि ते भाकीतही खरे ठरले. अजित पवारांच्या नाकावर टिच्चून नीलेश लंके यांनी तुतारी हातात घेतली.

कोणत्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या कोणत्या व्यवसायावर कारवाया हे स्पष्ट करावे लागणार!
महायुतीत सहभागी झाल्यानंतर मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मोठ्या अन्यायाचा सामना करावा लागला. माझ्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या व्यवसायांवर कारवाया झाल्या. त्यातून मी अस्वस्थ झालो. माझा कार्यकर्ताच अडचणीत येणार असेल तर मग अशावेळी बंड केल्याशिवाय आणि त्यांना त्यांची (विखे यांना) जागा दाखवून द्यावी लागणार असल्याची भावना निर्माण झाली आणि त्यातूनच आता हे पार्सल माघारी पाठविण्याचा विडा माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना उचलला असल्याचे जाहीर वक्तव्य नीलेश लंके यांनी सुप्यातील जाहीर मेळाव्यात केले. लंके यांच्या म्हणण्यानुसार त्यांची स्वत:ची कोणतीच कामे अडवली गेली नाही. ते मागतील त्या कामाला विखे पाटील यांचा विरोध झुगारुन निधी देण्याचे काम अजित पवार यांनी केले. त्यामुळे त्यांनी म्हटल्यानुसार त्यांच्यावर अन्याय झाला हे म्हणणेच चुकीचे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या व्यवसायावर कारवाया करुन सुड उगवल्याचा आरोप लंके यांनी विखे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला. या आरोपात तथ्य असेल तर मग विखे यांच्यामुळे अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांची नावे, त्या कार्यकर्त्यांचे विखे पाटील यांनी बंद पाडलेले व्यवसाय याची माहितीही आता जनतेसमोर येण्याची गरज आहे. त्यातून कारवाई, अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांची जंत्री मतदारांसमोर जाईल. त्यातून हे कार्यकर्ते कोण आणि त्यांचे व्यवसाय काय हे उघड होईल अन् मतदार मग काय तो निर्णय घेतील.

सुपा एमआयडीसीमधील ठेकेदारी, दहशतीच्या मुद्याचं काय?
दहावीपर्यंतचे शिक्षण, पुढे आयटीआयचं शिक्षण आणि त्यानंतर समाजकारण, राजकारणात आलेल्या नीलेश लंके यांना मोठा संघर्ष करावा लागला. (अलिकडेच त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली.) प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा तरुण अशी त्यांची पाच वर्षापूर्वीची ओळख! मात्र, आता ते स्वत:च प्रस्थापित होऊ लागले असल्याची जनतेत निर्माण झालेली भावना त्यांना अडसर ठरणार आहे. सुपा औद्योगिक वसाहतीमधील ठेकेदारी आणि दहशतीतून उद्योजकांमध्ये निर्माण झालेली भिती, ठेकेदारी मिळवण्यातून निर्माण झालेले टोळीयुद्ध याची चर्चा थांबायला तयार नाही. मध्यंतरी विस्तारित एमआयडीसीतील दोन उद्योजकांनी थेट केलेले स्थलांतर आणि त्यासाठी केलेल्या पत्रापत्रीतून अप्रत्यक्षपणे लंके व त्यांच्या समर्थकांवर साधलेला निशाणा बरेच काही सांगून जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी...

आरोपी रिक्षाने आले, वाट पहिली अन् थेट फायरिंग;…वाचा नेमकं काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...