छाप्यात सव्वा लाखाचे अमली पदार्थ व रोख पाच लाख जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर
घरात बसून गांजा व गर्द (हेरॉईन) विकत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुक्यातील शिवाजीनगर येथे छापा टाकून चार किलो ४९८ ग्रॅम वजनाचा व ४५ हजार ०३० रुपये किमतीचा गांजा, ७२ हजार रुपये किमतीचे गर्द (हेरॉईन) तसेच चार लाख १५० रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सह पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व अंमलदार सचिन अडबल, संतोष खैरे, अमृत आढाव प्रमोद जाधव, व उमाकांत गावडे आदींंचे पथक नेमले व जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
हे पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्दे करणार्या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि हेमंत थोरात यांना ०१ एप्रिल २४ संगमनेर तालुक्यातील शिवाजीनगर येथे अंबादास शिंदे (रा. शिवाजीनगर) हा घरी बसून गांजा व हेरॉईन यांची विक्री करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांचे सहकारी तसेच पंच घेऊन लागलीच शिवाजीनगर येथे जाऊन संशयित अंबादास शिंदे याच्या घरी गेले. तेथे अंबादास शिंदे पलंगावर बसलेला दिसला. त्यास नाव विचारून खात्री केली. नंतर पंचासमक्ष झडती घेत असतानाा अंबास शिंदे बसलेल्या पलंगाखाली पांढर्या रंगाच्या गोणीतून उग्र वास येत असल्याचे आढळून आले. ती गोणी उघडून पाहिली असता तीत बिया, बोंडे, काड्या, पाने संलग्न असलेला पाला आढळून आला. शिवाय त्याच्या पॅण्टच्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत विटकरी रंगाची पावडर आढळून आली.
पथकाने नंतर पलंगाचीही पाहणी केली असता पलंगामध्ये असलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत भारतीय चलनातील विविध दराच्या नोटा आढळून आल्या. पथकाने अंबादासला विचारणा केली असता त्याने पांढर्या रंगाच्या गोणीत बिया, बोंडे, काड्या, पाने संलग्न असलेला पाला हा गांजा व पिशवीतील पावडर ही गर्द (हेरॉईन) असून ते सर्व विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. तेव्हा पथकाने गोणीत ठेवलेला ४५ हजार ०३० रुपये किमतीचा ०४ किलो ४९८ ग्रॅम वजनाचा गांजा, ७२ हजार रुपये किमतीचे गर्द (हेरॉईन) व चार लाख १५० रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख १७ हजार १८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी अंबादास शिंदे यास जेरबंद केले.
त्याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन (गु. र. नं. ३२५/२०२४) येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.