छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत बंब यांनी गंगापुर तालुक्यात विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु एकीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी किटची पळवापळवी केली. यामुळे येथे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या विकास कामांचा कार्यक्रम बाजूला राहून लाभार्थी किटची पळवापळावीचीच चर्चाच सुरू झाली.
गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्य किट, स्पोर्ट किट, कामगार किट वाटपासाठी ठेवले होते. मात्र हे किट वाटप करत असताना गोंधळ उडाला. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीने सर्व पेट्या पळवायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे प्रशासनाकडून जाळ्या लावण्यात आल्या होत्या. पण त्या जाळ्या तोडून लोकांनी पेट्या पळवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे छोट्या पेट्यांचीदेखील लुटालुट करण्यात आली आहे. वेगवेगळे गाव आणि कामगारांना या पेट्यांचं वाटप केलं जाणार होतं. मात्र त्या गावच्या गावकऱ्यांना न मिळता दुसऱ्याच लोकांनी त्या पेट्या पळवून नेल्या आहेत.
गंगापूर तालुक्यातील सुलतानाबाद आरापुर शिवारात गंगापूर उपसा जलसिंचन योजना १’चे उद्घाटन आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना किट देण्याचे नियोजन होते. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी पत्रे उचकटून किटचे खोके आणि पेट्या पळवल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. नियोजनानुसार फडणवीस यांच्या हस्ते किटचे वाटप होणार होते. त्यासाठी लाभार्थी यांना टोकन देखील देण्यात आले होते. मात्र अचानक काही नागरिकांनी किट पळविल्या. आरोग्य, कामगार आणि खेळाडूसाठीच्या वेगेवेगळ्या किटची पळवापळावी सुरू होताच नागरिकांनी गर्दी केली. हाती येईल त्या किट घेऊन नागरिकांनी तेथून पळ काढला.