त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष / आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या सान्निध्यात महावीर स्वामींचे गुणगान, विविध स्पर्धांचे बक्षिसे जाहीर
अहमदनगर / नगर सह्याद्री :
अहिंसा परमो धर्म: अशा महान परममंत्राचा उपदेश देत संपूर्ण मानवजातीला दिशा देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) रविवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याशिवाय चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. शोभायात्रेनंतर आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले.
महावीर जयंतीदिनी सकाळी 7.30 वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपा (प्रसाद)ची गाडीही होती. आनंद संस्कार शिक्षा अभियान मंडळाच्या मुला मुलींनी लेझीमचे आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच त्यांनी हातात जैन ध्वज व भगवान महावीरांचे संदेश असलेले फलक घेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रा कापडबाजार जैन मंदिर येथून निघालेली शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल झाली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या.
शोभायात्रेनंतर आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, प्रबुध्द विचार आदर्शऋषीजी महाराज, संस्कारप्रेमी परम पूज्य अलोकऋषीजी महाराज, साध्वीरत्ना प.पू. पुष्पाकंवरजी, प.पू. आराधनाजी म.सा. आदी साध्वीजींच्या उपस्थितीत प्रवचन तथा गुणगाण झाले.
यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, अशोक(बाबूशेठ)बोरा, संतोष गांधी, सतीश लोढा, अभय लुणिया, नितीन कटारिया, आनंद चोपडा आदी उपस्थित होते. यावेळी दिगंबर जैन समाजातील महिला भगिनींनी भगवान महावीर यांचे स्तुतीगाण सादर केले.
महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज म्हणाले की, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे असते. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे.
आदर्शऋषीजी महाराज म्हणाले की, आज 2600 वर्षानंतरही महावीर स्वामींचे विचार मानवजातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते. आपण भगवान महावीर स्वामींचे अनुयायी आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजेे. आज जगात युध्दजन्य परिस्थिती आहे. अशावेळी भगवान महावीरांच्या विचारांची गरज आहे. भगवान महावीर यांच्यामुळे आपण आहोत हे लक्षात ठेवून प्रत्येकाने मनोमन त्यांचे तत्वज्ञान जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करावा. कार्यक्रमाच्या शेवटी पेमराज, संतोष, सतीश बोथरा (पारस ग्रुप) परिवाराच्यावतीने गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली.
रांगोळी स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक – गुगळे परिवार (चितळे रोड), (निता, मिना, काजल, स्नेहल, सिया, प्रतिक्षा, रोहित, नितीश, निखिल गुगळे). व्दितीय क्रमांक – मिनल पारख, राखी गांधी, साक्षी चंगेडिया, पूनम चोरडिया (आनंदधाम ), तृतीय क्रमांक विभागून – सोनाली बोरा, पूजा चंगेडिया, प्रेक्षा नहार, दर्शना नहार (नवीपेठ). उत्तेजनार्थ – मित चंगेडे (ख्रिस्तगल्ली), पलक कटारिया, प्रिती डागा (मुंजोबा चौक), प्रिया प्रशांत गांधी (ख्रिस्तगल्ली), आरती, शेजल कटारिया (डाळमंडई, जय आनंद फौंडेशन), ईश्वरी बोरा (लक्ष्मी कारंजा), आरती, वृषाली, जानव्ही, चेतना भालेकर.
चौक सजावट स्पर्धा- प्रथम क्रमांक- गुगळे परिवार (चितळे रोड ), व्दितीय क्रमांक – दिगंबर जैन मंदिर (गुजरगल्ली), तृतीय क्रमांक- जय आनंद महावीर युवक मंडळ (नवीपेठ). उत्तेजनार्थ- वर्धमान तरूण मंडळ (ख्रिस्तगल्ली), सराफ बाजार (प्रशांत मुथा), आडतेबाजार. स्पर्धांचे परीक्षण शैला गांधी व हेमा गुगळे यांनी केले.