अहमदनगर | नगर सह्याद्री –
नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार व घोटाळे स्पष्ट होऊनही अनेक आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. कोठेही लपून बसलेल्यांना जेरबंद करण्याची पोलिसांची हातोटी असली तरीही ते हतबल झाले व थेट न्यायालयाकडून याबद्दल त्यांना कानपिचयाही मिळाल्यात. यामागचे कारण म्हणजे सोशल मिडियात एक यादी लिक झाली व त्यानंतर नगर अर्बन घोटाळ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळालेले फरार झाले. अर्थात त्या यादीवर कोणाची सही नाही, पण यादीची चर्चा जोरात आहे. दरम्यान, बँकेतील गैरव्यवहार रक्कम प्रत्यक्षात ३७८ कोटी १० लाखांची आहे. पण त्यापैकी ८६ कोटी ८५ लाखांची रक्कम काही कर्जदारांनी परत भरल्याने आता अपहाराची रक्कम २९१ कोटी २५ लाखाची अंतिम झाल्याचे समजते.
नगर अर्बन बँक सध्या गैरव्यवहारामुळे गाजत आहे. मुंबईच्या डी. जी. ठकरार अँड असोसिएटस या फर्मने बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडीट केले आहे. त्यानुसार १०५ जणांनी बँकेला लुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपींचा शोध पोलिसांद्वारे सुरू आहे. यापैकी सातजणांना पोलिसांनी आतापर्यंत पकडले आहे. यात माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र लुणिया यांचा समावेश आहे. यातील काहींना जामीनही मिळाला आहे.
सचिन गायकवाड व मुकेश कोरडे यांना दीड वर्षांपूर्वी पकडले आहे. मात्र, बाकीचे ९८ आरोपी कोठे आहेत, याचा शोध पोलिसांना अजूनही लागला नाही. ठेवीदारांनी न्यायालयात तक्रार केल्यावर न्यायालयाने पोलिसांना कानपिचया दिल्या व आरोपींना पकडण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेशही दिले; पण पोलिस हतबल आहेत. वारंवार शोध घेऊनही गायब मंडळी सापडत नाही व त्यांचे मोबाईलही बंद आहेत. एका लिक झालेल्या यादीमुळे सारे गायब झाल्याची जोरदार चर्चा आहे.