जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार नाही – अध्यक्ष आनंद लोखंडे
अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे
अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने याआधी २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरु देखील करण्यात आला होता. दरम्यान सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर या लॉंग मार्चला स्थगिती देण्यात आली होती.
मात्र त्यानंतर आजतागायत सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी पुन्हा पाठपुरावा करत मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन्ही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची माघार घेणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, बलराज गायकवाड, विठठल उमाप, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, राजु पठारे, अजय सौदे, आदी मनपा कर्मचारी उपस्थित होते.