निघोज । नगर सहयाद्री
कपिलेश्वर यात्रोत्सवाच्या निमित्ताने निघोज येथे बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला. भिर्र..उचल की टाक..सेकंद ११,११, घ्या मोह घ्या बैल… पेती वासरं जुपिता का???? बैल नीट धरा…असा संवाद काल निघोजकरांच्या कानावर पडला त्याचबरोबर बैलगाडा मालकांची गाडा जुंपतानाची कसरत, बारी झाल्यानंतर भंडाऱ्याची उधळण. तरुणाईचा घाटातील जल्लोष. समालोचकांचा पहाडी आवाज, सोबत बघ्यांची गर्दी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरुषांबरोबरच महिलांनीही रखरखत्या उन्हात बैलगाडा शर्यतींचा मनमुराद आनंद लुटला.
अनेक वर्षांच्या बंदी नंतर होणाऱ्या बैलगाडा शर्यतीमुळे बैलगाडा मालकांच्या बरोबर बैलगाडा शौकीनांमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. दोन दिवस पार पडलेल्या शर्यतींमुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांची चंगळ झाली. एकुणच ग्रामीण अर्थकारणावर शर्यतींचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे. अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी..विठोबा जनाजी बो-हाडे, अविनाश लाळगे, बालघरे, विशाल कोंडीभाऊ खटाटे, सावळे राम उमाजी रोकडे (दोडकर बैलगाडा संघटना), अंतिम स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानकरी बाबाजी भाऊसाहेब निघुट, कैलास बन्शी डोमे. भागाजी यमनाजी निचित (योगी साम्राज्य बैलगाडा संघटना), अंतिम स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे मानकरी रामदास वराळ, जानकू डावखर, सुभाष आनंदा वराळ, ज्ञानेश्वर म्हस्के,
अंतिम स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संदीप दगडू बोदगे, आकर्षक बारीचे मानकरी, शिवम घोगरे व खंडू घुले. साक्षीताई संतोष माळुंगकर ( कै. विठोबा जनाजी बोऱ्हाडे बैलगाडा संघटना) विशाल कोंडीभाऊ खटाटे यांचे यात्रा कमिटी, मुंबईकर मंडळ व समस्त निघोज ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.