spot_img
अहमदनगरताबेमारी : राऊत साहेब; मुद्याचं पण अर्धसत्य बोललात!, मनपाच्या जागा कोणी घेतल्या...

ताबेमारी : राऊत साहेब; मुद्याचं पण अर्धसत्य बोललात!, मनपाच्या जागा कोणी घेतल्या याचाही अभ्यास करा…

spot_img

विरोधी मोर्चाचे नेतृत्व करण्याआधी ‘संग्राम’ विरुद्ध ‘महासंग्राम’ असा लढा उभारण्याची नैतिकता नगरच्या शिवसेनेत राहिलीय काय याचा होमवर्क करा!
सारिपाट / शिवाजी शिर्के – 
शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत [MP Sanjay Raut] दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये आले आणि त्यांनी नगर शहरातील कथित गुंडगीरी आणि ताबेमारीबद्दल भाष्य केले. नगरकरांना बरं वाटलं! नगरकरांना ताबेमारी नवीन नाही! रात्रीतून अनेकांच्या भूखंडांवर ताबेमारी झाली आणि त्यातून अनेकांना मनस्ताप देखील. नगरच्या आमदारांमुळेच ताबेमारी होत असल्याचा आणि त्यात दुरुस्ती झाली नाही तर त्याविरोधात आवाज उठविण्याचा इशाराही राऊत यांनी दिला. जमिनी बळकावणारी ताबेमारी, गुंडगीरी यामुळे नगर शहराने बिहारला मागे टाकले आहे, आमदार महाविकास आघाडी सरकारबरोबर होते. मात्र, राज्यातील नव्या सरकारसमवेत आता ते आहेत व त्या सरकारच्या पाठबळावर ते नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी करीत आहेत, असा गंभीर आरोप करतानाच संजय राऊत यांनी आमदाराच्या घरावर व पोलीस प्रमुखांविरोधात महाविकास आघाडी मोर्चा काढेल आणि त्याचे नेतृत्व मी करेल, असा इशाराही दिला. त्याच्याच जोडीने तुमच्या ‘संग्राम’ विरुद्ध आमचा ‘महासंग्राम’ आहे, असा गर्भित इशारा देणार्‍या राऊत यांना नगरच्या शिवसेनेबद्दलचा होमवर्क करावा लागणार आहे. आ. संग्राम जगताप [MLA Sangram Jagtap] यांच्याच आशीर्वादाने नगरच्या महापालिकेवर ठाकरे गटाची सत्ता कालपर्यंत म्हणजेच प्रशासक येईपर्यंत राहिली. राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी जगताप महायुतीसोबत गेले. त्याचवेळी नगरमध्ये जगतापांच्या कुबड्या फेका आणि सत्तेतून बाहेर पडा असा आदेश ना उद्धव ठाकरे यांनी दिला आणि ना संजय राऊत यांनी! आणि तसा आदेश दिलाही असता तर नगरमधील शिवसेनेच्या कोणत्याच नगरसेवकाने हा आदेश जुमानला नसता हे वास्तव आहे. त्यामुळेच संग्राम विरुद्ध आमचा महासंग्राम हे बोलण्याआधी संजय राऊत यांनी नगरचा होमवर्क करण्याची गरज होती आणि आहे.

 

शिवसेनेतील ठाकरे गटाचा मेळावा रविवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात व त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. ‘साडू-व्याह्यां’च्या ताबेमारीला खासदारांची म्हणजेच खा. सुजय विखे यांची साथ मिळत असल्याचाही आरोपही त्यांनी केला.राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर राऊत यांनी जोरदार आरोप केले. राऊत म्हणाले मुंबईत दाऊद, शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकावणे व दहशत करत होते. परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड असे म्हणत त्यांना रस्त्यावर उतरून विरोध केल्याने ते पळून गेले. अशाच पद्धतीने आता नगरमध्येही गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरेल असंही राऊत म्हणाले. मात्र, नगरमध्ये प्रत्यक्षात तसे कधीच होणार नाही. नगरची शिवसेना म्हणजचे ठाकरे आणि शिंदे गट या दोघांमधील काही लाभार्थी नगरसेवक हे ‘आयुर्वेद’मधील मिठाला जागत आहेत. जगताप यांच्याच आशीवार्र्दाने कोणाचे कसे दुकान चालू आहे हे नगरकरांना सर्वश्रुत आहे. दाऊद, शकील, अबू सालेम यांच्या खंडणी, जमीन बळकावण्याबाबत आणि त्यांच्या दहशती बाबत बोलणार्‍या राऊत यांनी नगरमध्ये जगताप यांच्याबाबत बोलताना होमवर्क करण्याची गरज आहे. त्यांच्याच पक्षाचे याआधीचे संपर्कप्रमुख कधी कुर्ल्यातील शाळेत बसून तर कधी आयुर्वेदमध्ये बसून नगरच्या शिवसेनेचे निर्णय घेत होते याचीही आठवण करुन देण्याची वेळ आता आली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर याच आ. संग्राम जगताप यांनी भाजपाशी काडीमोड घेत नगरच्या महापालिकेत शिवसेनेचा महापौर केला. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर जगताप यांनी महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच आ. जगताप हे भाजपसोबत गेले. त्याचवेळी आ. संग्राम जगताप यांनी ठरवले असते तर शिवसेनेच्या महापौर सौ. शेंडगे यांना पायउतार व्हावे लागले असते. मात्र, आ. जगताप यांनी शेंडगे यांच्यासह स्थानिक शिवसेना नगरसेवकांना दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला आणि ठाकरे गटाच्या महापौर रोहीणी शेंडगे या आपला कार्यकाळ पूर्ण करु शकल्या हेही वास्तव संजय राऊत यांच्यासह नगरमधील ठाकरे गटाच्या सेना पदाधिकारी-नगरसेवकांना मान्यच करावे लागेल.

खा. राऊत यांच्या आरोपानुसार आ. जगताप हे जर ताबेमारी आणि गुंडगीरी करत असतील तर मग त्याविरोधात शिवसेनेच्या नगरमधील कोणत्याच पदाधिकार्‍याने का आवाज उठवला नाही! संजय राऊत यांच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून लागलीच त्यास प्रत्युत्तर देण्यात आले. नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स या व्यापारी संकुलातील ताबेमारीबद्दल बोला, असा सल्ला लागलीच राऊत यांना देण्यात आला. हा सल्ला आता सेनेच्या राठोड गटाला चांगलाच जिव्हारी लागला असणार! ताबेमारीच्या मुद्यावर राऊत सहज बोलले पण राष्ट्रवादीचं तितक्याच ताकदीचं उत्तर पाहता हे प्रकरण सेनेच्याच अंगलट आलंय! संग्राम जगताप यांनी ताबा मारल्याचं एक उदाहरण दाखवा, असं जाहीर आव्हान जगताप समर्थकांनी दिलंय! मात्र, ते देताना नेता सुभाष चौकातील ताबा कोणी अन् कसा मारला यासह अर्बन बँकेचे या इमारतीवर कर्ज असताना ते कसे थकवले आणि संबंधित लोढा नामक बांधकाम व्यावयसायिक कसा अडचणीत आणला, याचा पाढाच जगताप समर्थकांनी वाचून दाखवलाय! राऊतांची भूमिका रास्तच होती आणि आहे. मात्र, त्यांच्याच पक्षातील येथील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते महापालिकेतील सत्तेत सहभागी होताना जगताप यांच्याच आशीर्वादाने कसे लाभार्थी झालेत आणि त्याच जगतापांच्या इशार्‍यावर महापालिकेचा कारभार कसा करत होते, याचीही माहिती खा. राऊत यांनी करून घेण्याची गरज होती.

माझ्याकडे नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात तक्रारींच्या अनेक फाइल्स आल्या असल्याचे सांगणार्‍या संजय राऊत यांनी राज्यात नवे सरकार आल्यापासून त्यांचे (जगताप) गुंडाराज वाढले असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यांचा कोण बॉस आहे हे स्पष्ट होऊ द्या, अशी मागणीही केलीय! खरं तर जगताप यांच्या विरोधात अनेक फाईल्स राऊत यांच्याकडे आल्याच असतील तर मग त्या कोणत्या कपाटात कशासाठी ठेवल्यात हेही नगरकरांना समजणे गरजेचे आहे. नवे सरकार आल्यापासून जगताप यांचे गुंडाराज वाढल्याचा आरोप करण्याआधी हेच जगताप आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये याच राऊत यांच्यासोबत होते, हे विसरुन कसे चालेेल! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस हे आ. जगताप यांचे पोशिंदे तर नाहीत ना, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. जगताप यांचे पोशिंदे कोण हे एकतर जगताप स्वत: सांगतील किंवा राऊत! पण, त्याआधी नगरच्या शिवसेनेचे खर्‍या अर्थाने पोशिंदे आ. जगताप हेच आहेत आणि त्यांच्यामुळेच नगरच्या महापालिकेत ठाकरे गटाला महापौरपद मिळाले, हे विसरुन कसे चालेल! त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि शेंडगे यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करता आला.

ठाकरे गट आणि शिंदे गट नगरमध्ये
गुण्यागोविंदाने नांदतोय, त्याचे काय?
राऊत साहेब, अनिल राठोड हे अनिल भैय्या राठोड होते!
नगरमध्ये गुंडगिरी वाढली असून ताबेमारी सुरू असल्याचा आरोप करणार्‍या संजय राऊत यांनी नगरमध्ये अनिल राठोड असते तर त्यांनी या विरोधात रस्त्यावरून संघर्ष केला असता याचा उल्लेख केला. पुढे बोलताना राऊत म्हणाले, त्याच अनिल राठोड यांनी कार्यकर्ते घडविले. त्यांचेच तुम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते असताना सर्वसामान्यांसाठी तुम्ही रस्त्यावर का उतरत नाही? त्यांच्यासारखे काम आपण कधी करणार असा प्रश्न उपस्थित करत पदाधिकार्‍यांना कानपिचया दिल्या. राऊत साहेब, तुम्ही अत्यंत रास्त मुद्दा मांडला. पण, अनिल राठोड हे अनिल राठोड होते. त्यांनी कधीच दुकान मांडले नाही. राठोड यांच्यासारखे काम त्यांचेच कार्यकर्ते, शिवसैनिक म्हणवून घेणारे नगरमधील पदाधिकारी का करत नाही असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. हाच प्रश्न सामान्य शिवसैनिकांना भावला आहे. राऊत साहेब, तुम्ही नगरमध्ये ‘संग्राम विरुद्ध महासंग्राम’ असा लढा उभा करणार असल्याचे जाहीर केलेय! हा लढा यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर त्याआधी नगर शहरातील शिवसेनेबाबतचा होमवर्क नक्की करा! पण, त्याआधी तुमच्या म्हणजेच ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेलं एखादं आंदोलन सांगा! तुमची लढाई एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असताना नगर शहरातील तुमची शिवसेना दिवस-रात्र त्याच शिंदे गटासोबत असते हेही लक्षात ठेवा! राऊत साहेब, जिल्ह्यात चार आमदार होतील की नाही याहीपेक्षा नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असताना आज त्याचा एखादा तरी बुरुज बाकी राहिला आहे काय याचाही अभ्यास करा! नगरमधील शिवसैनिकांना गृहित धरणे सोडून द्या! आधी आपल्या गटाचे पदाधिकारी आणि नगरसेवक दिवसा आणि रात्री कोणाच्या कार्यालयात आणि कोणाच्या ओंजळीने पाणी पितात याचा अभ्यास करा आणि मगच ‘संग्राम विरुद्ध महासंग्राम’ या लढाईबद्दल बोला! राहिला विषय ताबेमारीचा! त्यावर नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स या व्यापारी संकुलातील ताबेमारीबद्दल जगताप समर्थकांनी लक्ष वेधले आहेच! ते प्रकरण खुप जुने आहे! त्याबाबतही आता तुम्हालाच उत्तर द्यावे लागणार आहे.

राऊत साहेब, मनपाच्या जागा कोणी घेतल्या याचाही अभ्यास करा मग ताबेमारीचा तोरा मिरवा
खा. राऊत साहेब, आपण जागा ताबेमारीचा उल्लेख केलाच आहे, तर आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता असताना मोक्याच्या ठिकाणच्या जागा आपल्या कार्यकर्त्यांच्या नावावर भाडेपट्टीच्या नावाखाली कोणी घेतल्या, त्याचीही चौकशी करा. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ क्रीडा संकुलातील जागा बळकावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. या जागा कोणी घेतल्या, ते कोणाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना दिलेली जागा किती आणि तेथे बांधकाम किती सुरू आहे, हे एकदा तुम्ही तपासाच. त्यानंतरच ताबेमारीचा तोरा मिरविल्यास नगरकरांना ‘खरी शिवसेना’ पुन्हा एकदा दिसेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...