अहमदनगर। नगर सहयाद्री
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी पुढील आठवडाभर होणार्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत. १९ जानेवारीपर्यंत कोणालाही सुट्टी देऊ नये, असे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी विभाग प्रमुखांना काढले आहेत.
शहरात सर्वेक्षणासाठी किमान तीन हजार कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यात ५०० मनपा कर्मचारी व इतरांची नियुक्ती केली जाणार आहे.राज्य शासनाने येत्या आठवडाभरात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी गुरुवारी बैठक घेऊन या संदर्भात सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार नगर शहरातील सुमारे सव्वालाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.जनगणनेसाठी केलेल्या प्रगणक गटानुसार हे सर्वेक्षण करण्याचे नियोजन मनपास्तरावर सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. कर्मचारी नियुक्तीबाबत आदेश काढण्याची लगबग प्रशासन स्तरावर सुरू आहे.