मार्च हिट : 13 जण उष्माघातामुळं रुग्णालयात
मुंबई / नगर सह्याद्री –
महराष्ट्रात उकाड्यात वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच कडक उन्हाळ्याची जाणीव व्हायला लागली आहे. उन्हाच्या काहिलीमुळं मार्चमध्येच 13 जणांना हिट स्ट्रोकचा सामना करावा लागला आहे. 13 जणांना उष्माघातामुळं रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. राज्यातील अनेक भागात दिवसा तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे. मुंबईकरांना मात्र याबाबत थोडा दिलासा मिळणार आहे. कारण, शहराचे तापमान 32 ते 33 डिग्री सेल्सियस इतके आहे. मात्र, अन्य जिल्ह्यात तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळं नागरिक होरपळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे अद्याप उष्माघाताची लहर सुरू झाली नसली तरी तापमानाचा पारा चढल्याने डिहाड्रेशनची समस्या जाणवू लागली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडीवारीनुसार, मार्चमध्ये एकूण 13 जण उष्माघाताचे शिकार झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक प्रकरणे बीडमध्ये असून 4 जणांना त्रास जाणवला आहे. रायगडमध्ये 2 आणि अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यात 1 रुग्ण सापडला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तापमानाचा पारा भलेही 40 अंशावर गेला असला तरी ते सामान्यपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान आहे. सध्या तापमानात कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाहीये.
एप्रिलमध्ये आणखी उष्मा वाढणार
हवामान विभागाचे अधिकारी ऋषिकेश आग्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईचे तापमान 32 ते 33 अंश सेल्सियसपर्यंत असेल. मात्र, उष्मा वाढल्याने आणि दमट हवामानामुळं अस्वस्थता वाढेल. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उपनगरात दिवसाचे तापमान 32.7 डिग्री आणि शहराचे तापमान 31 अंशपर्यंत होते.
आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी उष्माघातासंदर्भात एक अॅडवायजरी जारी केली आहे. लोकांनी उन्हात घराबाहेर जाणे टाळावे, अधिक पाणी प्यावे. सूती किंवा कॉटनचे कपडे घालावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.