शिर्डीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना, शिंदे गटाकडून लोखंडे तर ठाकरेंकडून वाकचौरे
शिर्डी। नगर सहयाद्री-
शिवसेना एकनाथ शिंदे गटाने लोकसभा उमेदवारांची आठ जणांची यादी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार लोखंडे यांना पुन्हा एकदा शिर्डीतून संधी दिली आहे. शिर्डीत ’शिवसेनाविरुद्ध शिवसेना’ असा सामना रंगणार आहे. महायुतीत असलेल्या रिपाई आठवले गटाचा, अर्थात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा आणि ’मनसे’चा शिर्डीच्या जागेसाठी ’पत्ता कट’ झाला.
महायुतीत मनसेची एन्ट्री झाली, तेव्हापासून शिर्डी, नाशिक, दक्षिण मुंबईच्या जागांबाबत पेच निर्माण झाला होता. शिर्डी आणि नाशिकची जागा मनसेला जाणार अशीच काहीशी चर्चा होती. यातच शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे मतदारसंघात संपर्कात नसल्याचे आरोप वारंवार होत होते. त्यामुळे त्यांचा ’पत्ता कट’, अशीच काही शयता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीच्या जागेबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादी जाहीर केली. यात खासदार लोखंडे यांचे नाव यादीत तिसर्या क्रमांकावर आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून मनसेच्या पूर्वी रिपाई आठवले गट जागेसाठी इच्छुक होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील जागेवर दावा सांगितला होता. महायुतीत नुकताच एन्ट्री झालेल्या मनसेने देखील शिर्डीच्या जागेवर दावा सांगण्यात सुरूवात केली होती. नाशिक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा झाला होता.
यावेळी श्रीरामपूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिर्डीच्या जागेवर दावा सांगत, बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. या राजकीय घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा महायुतीत प्रतिष्ठेची करत खासदार लोखंडे यांना पुन्हा एकदा संधी दिली. या संधीवरून शिर्डी लोकसभा मतदारसंघात ’शिवसेनाविरुद्ध शिवसेना’, असा सामना रंगणार आहे.