विकासकामांची शिदोरी ही जमेची बाजू | नाराजांची संख्या मताधिक्यात ठरू शकते अडसर
डॉ. सुजय विखे पाटील / ग्राउंड रिपोर्ट / शिवाजी शिर्के
गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच चौथ्या पिढीतील सुजय विखे यांनी नगरचे नेतृत्व हाती घेतले. कामाचा व्यासंग आणि आवाका ही त्यांची जमेची बाजू! मात्र, सातत्याने त्यांच्या विरोधात विरोधक एकवटलेले! काही निवडणुकांमध्ये त्यांच्या विरोधात सारे विरोधक एकवटलेले असतानाही त्यांनी विजयश्री खेचून आणली. आताच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी दुसर्यांदा सामोरे जाताना चांगले नियोजन केल्याचे आणि विरोधकांना जवळ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ही त्यांची जमेची आणि संघटनकौशल्याची चतुराई म्हटली पाहिजे. मात्र, असे असले तरी पुढार्यांवरची ही भिस्त अंगलट येणार नाही याची काळजी त्यांना घ्यावीच लागणार आहे. नाराजांची संख्या कमी करण्यावर भर देत मताधिक्य कसे राहील याची काळजी घ्यावी लागणार आहे. नगर शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, मनपा पाणी योजना, तीन एमआयडीसी, तीन उड्डाणपुलांची मंजुरी असे महत्वपूर्ण विषय सुजय विखे यांनी मार्गी लावले असताना नगर शहरातून निर्णायक मताधिक्य मिळवण्यासाठी त्यांना जोर लावावा लागणार आहे.
लोणी- प्रवरेतील साम्राज्य चौथीपास विठ्ठलरावांनीच उभारले हे विसरुन कसे चालेल!
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी लिहिलेल्या ‘सहकारधुरीण’ या पुस्तकात त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात, विठ्ठलराव हे मुंबईत सचिवांना भेटायला गेल्यावर ही लोकं विठ्ठलराव यांची थट्टा करत, कधी मागे कुचाळया करत. पण विठ्ठलराव शांत पणे ऐकून बेरकीपणा दाखवून सगळ्यांना वठणीवर आणत. त्यावेळी मुंबईत बर्या पैकी गुजराती, मारवाडी लॉबीची पकड होती. विशेष गोष्ट म्हणजे धंदा करावा तर याच लोकांनी अशी लोकांतील धारणा प्रबळ होती, त्या काळात विठ्ठलराव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांचा व्यवसाय उभा करायला पाहत होते. हा प्रसंग वाचताना विठ्ठलराव यांच्या डोयावरील फेटा, हातातील काठी, कुठेही जाताना कोटात बांधून नेलेलेली भाकर या साध्या राहणीमाना मुळे आणि ग्रामीण मराठी भाषेमुळे त्यांना खूप हिणवले गेले, पण ध्येयाच्या प्रती त्यांची स्पष्टता असल्याने त्यांना या गोष्टी कधी अडचण वाटल्या नाहीत. लोकांना प्रामाणिकपणा कळतो, कष्ट कळते त्यावेळी लोक मागे उभा राहतात; असेच लोक विठ्ठलराव यांच्या मागे सहकार उभारणीसाठी उभा राहिले ताकद दिली. सुजय विखे ज्या प्रवरा- लोणीतील साम्राज्याच्या जीवावर इंग्रजी बोलण्याची भाषा करत आहेत ते साम्राज्य चौथी पास व्यक्तीने उभारलेय हे विसरुन कसे चालेल!
प्रा. राम शिंदे- रोहित पवार या दोघांच्याही बद्दल साशंकतेचे वातावरण!
गेल्या वर्ष- दीड वर्षांपूसन भाजपा आ. प्रा. राम शिंदे यांनी आपण लोकसभेचे उमेदवार असणार आणि आपण लढणार असे सुतोवाच चालूच ठेवले होते. विखे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख निर्माण केलेल्या नीलेश लंके यांच्याशी ते संधी मिळेल तेथे गळाभेट घेत होते. विखेंना डिवचणे हाच त्यामागील त्यांचा उद्देश होता हेही लपून राहिले नाही. मात्र, भाजपाची उमेदवारी सुजय विखे यांना मिळाली. यानंतर फडणवीसांच्या मध्यस्थीने वाद मिटवला गेला आणि शिंदे यांनी विखेंच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असा शब्द दिला. शिंदे यांची लंके यांच्याशी असणारी जवळीक आ. रोहीत पवार यांना खटकत होतीच! त्यामुळे रोहीत पवार लंके यांच्यापासून दुरावले होते. आता शिंदे यांनी विखे यांच्यासाठी बैठका सुरू करताच रोहीत पवार यांनी लंके यांच्यासाठी दोन-तीन बैठका घेतल्या! मात्र, या दोघांच्याही या भूमिका अशाच कायम राहतील आणि या दोघांचेही कार्यकर्ते या दोघांच्या आवाहनाला प्रतिसाद देतीलच याबद्दल कोणीही शाश्वती द्यायला तयार नाही.
सुजय विखे हे फोन घेत नाहीत हा एकच मुद्दा!
विकास कामांचा मोठा डोंगर उभा राहिला. त्यातून कामेही मार्गी लागली. अनेक वर्षांचा या मतदारसंघातील बॅकलॉग भरुन निघाला हे सारे वास्तव सत्य विरोधकही नाकारत नाहीत. त्यामुळेच सुजय विखे यांच्या विरोधात बोलताना ते तुमचे फोन घेतात का?, असा थेट सवाल विरोधक करु लागले आहेत. त्यांचे दहा- पंधरा पीए आणि त्यांच्यानंतर त्यांना वाटले तर तुमचा संपर्क असा जाहीर चर्चांचा फडच सध्या या मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने झडू लागला आहे. अर्थात हाच फट साडे चार वर्षांपूर्वी पारनेरमध्ये विजय औटी यांच्या विरोधात लढताना नीलेश लंके यांनी वाजवला होता. त्यात यश आल्याने आता पुन्हा तोच मुद्दा अन्य तालुक्यांमध्ये बिंबवण्याचे काम होत आहे.
भाजपा विरोधी लाट थोपविण्याचे मोठे आव्हान!
शेतीमालाचे पडलेले भाव आणि अडचणीत आलेला शेतकरी हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत असतोच! कांद्याचे बाजारभाव हा मुद्दा देखील कोणत्या निवडणुकीत आला नाही असे नाही! मात्र, यावेळी तो अधिक जोरकसपणे समोर आला आहे. त्यातून भाजपाचे म्हणजेच मोदी यांचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा प्रचार केला जात आहे. शेतकर्यांमधून देखील याबाबतच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ही चर्चा थांबणार नसली तरी त्या चर्चेला विकास कामे आणि व्यक्तीगत तसेच सार्वत्रिक लाभाच्या योजनामधून मिळालेला लाभ याची माहिती विखे व त्यांच्या यंत्रणेला द्यावी लागणार आहे.
विरोध विखेंना नव्हे भाजपाला!
निवडणूक कोणतीही असली तरी ती निवडणूक विखे विरुद्ध सारे अशीच होते. संपूर्ण देशात भाजपाची लाट आहे की विरोधात आहे हे निवडणूक निकालानंतर जाहीरपणे समोर येईलच! मात्र, नगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखे परिवाराची सातत्याने पकड राहिली असल्याचे वास्तव आहे. कार्यकर्त्यासह जनतेच्या सुखदु:खात सहभागी होणार्या या परिवाराने जिल्ह्यात अनेकांचे परिवार उभे केले. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे अन्य कोणत्याही पक्षात असणारे समर्थक व त्यांच्या अडचणी या परिवाराने आपल्या अडचणी मानल्या आणि त्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यामुळेच भाजपाबद्दल काही ठिकाणी शेतीमालाच्या पडलेल्या भावाबद्दल आणि अन्य मुद्यांवर नाराजी असली तरी विखे यांच्याबद्दल असणारी आत्मीयता सुजय विखे यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
शहर नामांतराचे फायदेही अन् तोटेही!
अहमदनगरचे नामानंतर अहिल्यादेवी नगर करण्यात आले. या नामांतराने धनगर मतदार खुष झाला आणि आपसूकपणे भाजपाच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून येते. मात्र, त्याच्याच नेमके उलट घडले ते मुस्लिम समाजाबाबत! नामांतरच्या याच मुद्यावर हा समाज नाराज असल्याचे काही ठिकाणी दिसून येते. अर्थात नगर शहरात हा समाज आता थेटपणे विखे पाटील आणि जगताप परिवाराशी जोडला गेला असल्याने येथे डॅमेज कंट्रोल होईलही! मात्र, मतदारसंघातील ग्रामीण भागातील मुुस्लिम समाज आणि मागास समाज आपल्या पारड्यात खेचण्यासाठी विखेंना शिकस्त करावी लागणार आहे.
साकळाई पाणी योजनेचे दोघांकडूनही आश्वासन; दोघांनाही विसर!
नगर तालुक्यातील काही गावांना वरदान ठरणार्या साकळाई पाणी योजनेचा मुद्दा आजही चर्चेत आहे. या योजनेसाठी विखेंनी मागील लोकसभा निवडणुकीत आणि नीलेश लंके यांनी त्यांच्या गत विधानसभा निवडणुकीत शब्द दिला होता. राज्याच्या सत्तेत राहून देखील लंके यांना या योजनेसाठी काहीही करता आले नाही. विखे यांनी शेवटच्या टप्प्यात या योजनेसाठी बैठका लावल्या. त्यातून योजनेचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होईल असे वाटत असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. आता निवडणुकीच्यानंतर निकाल काहीही लागला तर या योजनेचे फक्त इलेक्शनसाठीचे कॅपेनिंग होऊ नये याची काळजी विखे- लंके या दोघांनाही घ्यावी लागणार आहे!
लंके यांना पारनेरमध्ये रोखण्यासाठी शिकस्त करावी लागणार!
सुपा एमआयडीसीतील दहशतीचा मुद्दा आणि तेथील गुंडागर्दीला मिळालेला राजाश्रय कोणाचा हे लपून राहिलेले नाही. या राजाश्रयाच्या जाचाला कंटाळूनच आता येथे नव्या कंपन्या यायला तयार नाहीत. सुप्याची एमआयडीसी आणि येथील कंपन्या हप्तेखोरीचे अड्डे झालेत आणि त्यातून मिळणारा मलिदा गोरगरीबांच्या हिताआड आणला जात असल्याचेही सर्वश्रूत आहे. विरोधी नीलेश लंके हे याच तालुक्यातील! या तालुक्यातून लंके हे एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतील असा दावा त्यांचे समर्थक करतात. विखे व त्यांच्या समर्थकांना हाच दावा फोल ठरविण्यासाठी प्रयत्नांची शकस्त करावी लागणार आहे.
संपर्काचा अभाव हाही झाला अपप्रचाराचा मुद्दा!
लोकसभेच्या मागील पाच वर्षात सुजय विखे यांचा गावागावातील संपर्क अभावानेच राहिला असल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. गावागावात विकास कामे केल्याचे सांगतानाच कोरोना कालावधीतील दोन- अडीच वर्षे, त्याचवेळी राज्यात माझ्या विचाराचे सरकार नसणे हे मुद्दे सुजय विखे सांगत आहेत. मतदारांनाही ते भावत आहेत. मात्र, हे सारे होत असताना गावागावाशी त्यांचा थेट संपर्क कमीच राहिला. गेल्या वर्षभरापासून त्यांनी हा संपर्क वाढवला असला आणि विकास कामे घेऊन त्यानिमित्ताने संवाद चालवला असला तरी संपर्काचा अभाव हा मुद्दा त्यांच्या विरोधात आहेच!
ठाकरेंबद्दलची सहानुभूती नाकारून चालणार नाही!
शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे- शिंदे असे दोन गट पडले. प्रकरण न्यायालयात आणि आयोगात गेले. या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल गेला. शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाले. वास्तविक पाहता शिवसेनेची स्थापना कोणी केली हे सर्वश्रूत आहे. मात्र, कायद्याचा किस लागतो तो कागदावर! ठाकरे गट येथे कमी पडला आणि त्यातून ठाकरे यांच्या हातून पक्षासह चिन्ह देखील गेले. मात्र, असे झाल्यानंतर ठाकरे गटाला मोठी सहानुभूती मिळाली हे नाकारता येणार नाही.
काय घ्यावी लागणार काळजी!
श्रीमंती विरुद्ध गरीबीचा मुद्दा या निवडणुकीत पेटवला गेलाय! अर्थात एकाची श्रीमंती जाहीरपणे दिसतेय तर दुसर्याची पडद्याआड आहे. पडद्याआडचं गाठोडं किती मोठं आणि ते गाठोडे कोणकोणत्या कार्यकर्त्याच्या नावावर कसे आहे हे शोधून जनतेच्या समोर आणण्याचे काम श्रीमंत म्हणून जाहीरात झालेल्या उमेदवाराला व त्याच्या समर्थकांना करावी लागणार आहे.
लंके यांच्याकडे पाठ फिरवलेली नवी मुंबई- कामोठा- पनवेलमधील तरुणाई अन् त्यांचा झालेला अपेक्षाभंग आता निर्णायक वळणावर!
विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन वर्षे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबईत जाता- येता कामोठे- नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुणांचा अत्यंत पद्धतशिरपणे वापर करण्यात आला. याशिवाय मुंबईस्थीत सुरेश धुरपते यांच्यासह अनेक तरुण उद्योजकांना अमिषे दाखविण्यात आली. मात्र, आमदारकीची माळ गळ्यात पडताच यातील काहींना खड्यासारखे बाजूला करण्यात आले. पिंपळगाव रोठा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याआधी लंके यांच्यासाठी मुंबईस्थीत उद्योजकाने मोठा निधी दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत हा उद्योजक स्वत: लंके समर्थकांच्या विरोधात पॅनल करून उभा राहताच ‘हा धीरुभाई अंबानी आहे काय? याला पाडून टाका’, असे जाहीर भाषण याच लंके यांनी ठोकले. या भाषणाचा काहीही परिणाम न होता तो उद्योजक व त्याचा पॅनल निवडून आला आणि तो स्वत: उपसरपंच झाला. हे एक उदाहरण आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. पारनेर तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीत मुंबईकर नेहमीच निर्णायक भूमिका घेत असतात आणि त्यांचा कौलच निर्णायक ठरतो. विधानसभा निवडणुकीनंतर यातील अनेकांना त्यांचे उद्योग- व्यवसाय बंद पाडण्याची आणि त्यांना कुटुंबासह रस्त्यावर आणण्याची धमकी दिली गेली. आता ही सर्व मुंंबईकर निर्णायक भूमिकेत आली असल्याने त्यांच्या भूमिका आणि त्यांना आधार देण्याचे काम सुजय विखे हे कसे करतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.