spot_img
ब्रेकिंगलोकशाही धोक्यात! आता इंडिया आघाडीचेच सरकार!, देशातील दहशतीचं राज्य जनता उलथून टाकणार;...

लोकशाही धोक्यात! आता इंडिया आघाडीचेच सरकार!, देशातील दहशतीचं राज्य जनता उलथून टाकणार; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

spot_img

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची विशेष मुलाखत / गुंडांच्या टोळ्यांसह त्यांची पाठराखण करणार्‍या नेत्यांची गुन्हेगारी घातकच | वाळू धोरण, तलाठी भरतीच्या मुद्यावर सरकार अपयशी / राज्यकर्तेच गुन्हेगारांचे सहकारी झाल्याची व्यक्त केली शंका
थेट भेट / शिवाजी शिर्के – 
AHMEDNAGAR CONGRESS मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या वाळू धोरणाचं काय झालं?, तलाठी भरतीतील गैरप्रकार आणि त्यात आलेलं अपयश यासह संपूर्ण राज्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची दुटप्पी निती यातून राज्यात असलेलं दहशतीचं राज्य आता जनताच उलथून टाकेल, असा विश्वास राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ईडी, निवडणूक आयोग यासह स्वायत्त समजल्या जाणार्‍या अन्य संस्थांमधून न्याय मिळण्याची सुतराम शक्यता नाही. आता जनतेच्या न्यायालयात उतरण्याचा निर्णय आम्ही घेतलाय आणि त्याच न्यायालयात सत्ताधार्‍यांच्या विरोधातील निकाल लागेल असा विश्वास आ. थोरात [MLA BALASAHEB THORAT] यांनी व्यक्त केला.

आ. बाळासाहेब थोरात नगरमध्ये आले असता त्यांनी ‘नगर सह्याद्री’शी ‘थेट-भेट’ या व्यासपीठाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थित होते. आ. थोरात यांनी बहुतांश प्रश्नांना थेटपणे उत्तरेे देताना गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची दशा अन् दिशा यावर भाष्य केले. नगरमध्ये वकिल दांपत्याची अत्यंत थंड डोक्याने हत्या करण्यात आली. न्याय देण्याचे काम करणारा वकिल हा घटकच सध्या दहशतीखाली आला असताना सामान्य जनतेच्या मनात काय असेल याचा अंदाज येतो.

संपूर्ण देशासह राज्यात गुन्हेगारांवरील प्रशासन अन् शासनाचा धाक संपला आहे. राज्यकर्तेच गुन्हेगारांचे सहकारी झाल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले असून आता जनतेनेच आवाज उठवला पाहिजे, अशी अपेक्षा आ. थोरात यांनी व्यक्त केली. जनतेच्या हितासाठी आम्ही मोदी-शहांच्या सोबत गेलो, असे अजित पवार म्हणत असल्याचे निदर्शनास आणून देताच आ. थोरात यांच्या चेहर्‍यावर हसू दिसले. ‘जनतेचे हित, कोणते हित! जनता दूध खुळी आहे काय? रस्त्याने जाणारा वेडा माणूस सुद्धा सांगेल की हे कशासाठी त्यांच्यासोबत गेलेत! निळवंडेच्या मुद्यावर बोलताना त्यांनी विखे पाटलांचा नामोल्लेख टाळला. मात्र, या कामाचे संपूर्ण श्रेय महाविकास आघाडीचेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कामाचे श्रेय त्यांना कोणीच देत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

आरक्षणाआडचे राजकारण
सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारं!
समाजातील सर्वच घटकांना व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन सरकार चालवावं लागतं. मात्र, देशातील आणि राज्यातील या सरकारला समाजा-समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल अन् त्यातून आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल याचं पडलेलं दिसत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालविताना समाजातील सर्व घटकांना आणि सर्व समाजांना न्याय कसा देता येईल, याची काळजी सरकारनं घ्यायची असते. दुर्दैुवाने केंद्र आणि राज्यातील कारभार्‍यांना खुर्चीचं राजकारण महत्वाचं वाटत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर वेगवेगळ्या भूमिका घ्यायच्या आणि त्यातून समाजा-समाजात तेढ करण्याची भूमिकाच चुकीची आहे. त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार असून ते कोणत्याच सरकारला परवडणारं नाही, असं स्पष्ट मत आ. थोरात यांनी व्यक्त केला.

सत्तेसाठीची अशी हतबलता
यापूर्वी कधीच पाहिली नाही!
सत्ता येते आणि जाते. आम्हीही सत्तेत होतो आणि विरोधातही! मात्र, केंद्रापासून राज्यातील भाजपाचे कारभारी सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहेत आणि त्यातूनच गुन्हेगारी फोफावत असल्याचं टिकास्त्र आ. थोरात यांनी सोडले. राज्यातील जनता पाणी आणि दुष्काळाच्या मोठ्या प्रसंगातून प्रवास करत आहे. कठीण प्रसंग शेतकर्‍यांसमोर आहेत. कांदा, कापूस, सोयाबीन याचे पडलेले भाव अन् अवकाळी पावसाने मोडलेले कंबरडे, त्यापाठोपाठ टँकरची वाढती मागणी यावर निर्णय घेण्यास या सरकारला वेळच नाही. त्यांना वेळ आहे तो खुर्ची वाचविण्यासाठी! सत्तेसाठीची अशी हतबलता आपण यापूर्वी कधीच पाहिली नाही, असा टोलाही आ. थोरात यांनी लगावला.

देशाची लोकशाही धोक्यात!;
आता जनताच निर्णय घेणार!
स्वायत्त समजल्या जाणार्‍या संस्थाच राजकीय निर्णय घेत असल्याचे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या निर्णयातून समोर आले आहे. लोकशाही कशी आणि किती धोक्यात आलीय हे चंदीगडमध्ये महापौर निवडीवरुन समोर आले आहे. लोकशाही धोक्यात आली असताना आता जनतेलाच निर्णय घ्यावा लागणार आहे. तसे झाले नाही तर देशात अराजकता आणि हुकुमशाही जन्माला घालण्याचे पाप जनतेच्याच माथी पडणार असून त्याबाबतचा निकाल आता सर्वांना मिळून घ्यावा लागणार आहे. तो निकाल देशातील जनता नक्कीच येणार्‍या लोकसभेत देतील असा विश्वास आ. थोरात यांनी व्यक्त केला.

तिघांच्या तिघाडीत जनता होरपळतेय!
राज्यातील सरकार आणि त्यांच्या कारभाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आ. थोरात यांनी बोचरे उत्तर दिले. राज्यातील सध्याच्या तीन कारभार्‍यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपद टिकवायचं पडलं आहे. एका उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडत आहे आणि दुसर्‍या उपमुख्यमंत्र्यांनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. या तिघांच्या तिघाडीत राज्यातील प्रश्न ऐरणीवर आलेत. जनतेच्या मनात या तिघाडीतील कारभार्‍यांच्या विरोधात मोठा असंतोष आहे. या तिघाडीच्या सरकारचा कडेलोट आता जनताच करणार असल्याचा विश्वास आ. थोरात यांनी व्यक्त केला.

अहो देवेंद्रजी, गाडीखाली कुत्र नव्हे,
पिस्तुलानं माणसं मारली गेलीत अहो!
शिवसेना ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून फेसबुक लाईव्ह चालू असताना हत्या झाल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीनंतर फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना ‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील’, असं उत्तर दिले. त्याकडे लक्ष वेधले असता आ. थोरात यांनी या उत्तरावर नापसंती व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस हे सृजणशिल आहेत. त्यांच्या गाडीखाली कुत्रे मेलीत की नाही हे माहिती नाही. मात्र, ते ज्या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्या राज्यात पिस्तुलाने समोरासमोर माणसं मारली गेलीत. त्याची जबाबदारी ते घेणार आहेत की नाही, असा थेट सवाल उपस्थित केला.

देशात इंडिया आघाडीचेच सरकार!
जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सरकारचा गुर्‍हेगारांवर धाक राहिला नाही. देशातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे आता जनतेनेच आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. हुकुशाहीच्या विरोधात आता जनतेच्या मनात प्रचंड चिड असल्याने देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा विश्वास आ. थोरात यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकणार
नगरची जागा राष्ट्रवादीकडे असून तेथील उमेदवार कोण याचा निर्णय शरद पवार घेणार आहेत. शिर्डीच्या जागेवर आमच्यासह उद्धव ठाकरे यांनीही दावा केला आहे. मात्र, याबाबत वाद न होता निर्णय होईल. ‘जिंकणे’ हाच निकष ठरला असल्याने नगरसह शिर्डीची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास आ. थोरात यांनी व्यक्त केला.

नगरमध्ये मतदारांसह सार्‍यांचाच भ्रमनिरास!
पाच वर्षापूर्वी नगर लोकसभा मतदारसंघात आश्वासनांचा पाऊस पाडला. प्रत्यक्षात काय झाले? कार्यकर्त्यांसह जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. सामान्य जनतेसाठी कायम नॉट रिचेबल राहिलेले आता जनतेच्या पाया पडताना दिसत आहेत. सामान्य जनतेपक्षाही त्यांना पक्षांतर्गतच मोठा विरोध आहे. तो विरोधच त्यांना यावेळी पराभूत करणार आहे. या मतदारसंघात मविआचा उमेदवार अद्याप ठरला नसला तरी जो उमेदवार असेल तो त्यांना धोबीपछाड देणार यात शंका नसल्याचा निर्वाळाही आ. थोरात यांनी दिला.

नगरमध्ये किरण काळेंच्या जोडीने
जयंत वाघ सर्वांना लढताना दिसेल!
राजेेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांना काँग्रेस पक्षाने न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या स्थानिक अडचणीतून त्यांनी काँग्रेस सोडण्याची भूमिका घेतली. संगमनेरमध्ये येऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आता आम्ही येथे दुरुस्ती केली असून जयंत वाघ हा आमचा वाघ आता तुम्हाला नगरमध्ये लढताना दिसेल. किरण काळे यांनी शहरात अत्यंत आक्रमकपणे पक्ष संघटना बांधणी केलीय! त्याच्या पाठीशी काँग्रेसचे सर्वच नेते आहेत. जयंत वाघ हा आमचा वाघ किती निर्णायक असेल हे जिल्ह्याला लवकरच दिसेल इतकेच!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

Ahmednagar: पाणीपुरवठा विस्कळीत होणार? महावितरणाने दिला महापालिकेला ‘असा’ इशारा

अहमदनगर | नगर सह्याद्री महापालिकेकडे थकीत असलेल्या पाणी योजना व पथदिव्यांच्या विजेच्या थकीत बिलापोटी महावितरण...