अहमदनगर | नगर सह्याद्री
सरकारी कर्तव्य बजावित असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ, मारहाण करून भर रस्त्यात त्यांच्याशी गैरवर्तन केले. भिंगारवाला चौकाकडे जाणार्या रस्त्यावर व्दारकाधीश लस्सी दुकानाच्या जवळ गुरूवारी (दि. १८) सायंकाळी ही घटना घडली.
याप्रकरणी पीडित महिला पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश सखाराम घोलप (वय ५२ रा. नांगरे गल्ली, नगर) याच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा, विनयभंग, शिवीगाळ, मारहाण कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला पोलीस अंमलदार नगर शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्या गुरूवारी सायंकाळी भिंगारवाला चौकाकडे जाणार्या रस्त्यावर व्दारकाधीश लस्सी दुकानाजवळ सरकारी कर्तव्य बजावित असताना तेथे आलेल्या प्रकाश घोलप याने त्यांना शिवीगाळ करून हुज्जत घातली.
फिर्यादीला हात धरून चापटीने मारहाण केली. त्या करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून भर रस्त्यावर त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिला पोलीस अंमलदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक कोकाटे करत आहेत.