मनमाड। नगर सह्याद्री
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या गाडीवर तरुणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी गुरुवारी नाशिकच्या येवला तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्रीउशिरा ते कारने मनमाड मार्गे धुळ्याकडे निघाले असतांना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. संभाजी भिडे मुर्दाबादच्या अशा घोषणा देत तरुणांनी त्यांची गाडी अडवली.
यावेळी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी आक्रमक झालेल्या काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आणि गाडी अडवणाऱ्यांना बाजूला केले. त्यानंतर संभाजी भिडे धुळ्याकडे रवाना झाले. भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.