संगमनेर। नगर सहयाद्री
स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरमध्ये गोमांस विक्री करणार्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. यावेळी ८५० किलो गोमांस व तुकडे, १ सुरा व १ कुर्हाड असा १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अनिस गुलाम हैदर कुरेशी (वय २४, रा. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमास विक्री व वाहतुकीबाबत माहिती घेत कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.त्यानुसार आहेर यांनी ५ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार सचिन आडबल, संतोष खैरे, अमृत आढाव व आकाश काळे यांना संगमनेर परिसरात पेट्रोलिंग करुन गोमास विक्री करणार्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार कार्यवाही सुरु असताना अनिस कुरेशी हा भारतनगर भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत वरील आरोपीस ताब्यात घेत १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुकर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.