शिर्डीतील शिबिराला सुरूवात
शिर्डी। नगर सहयाद्री
काहींनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचा विडा उचलला आहे; पण जोपर्यंत शिवाजी महाराज आणि आई भवानींचा तुम्हाला आशीर्वाद आहे, तोपर्यंत तुम्ही घारबण्याचं कारण नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोमणा मारला आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दोन दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले आहे. त्याची सुरूवात बुधवारपासून (दि. ३) झाली. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघात, पुणे जिल्ह्यात जन आक्रोश यात्रा काढली.
त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अमोल कोल्हे यांनी प्रामाणिकपणे शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या समोर आणला. काहींनी त्यांना पाडण्याचा विडा उचलला आहे; पण जोपर्यंत महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आहे तोपर्यंत त्यांनी घाबरण्याची गरज नाही. सर्व पक्ष तुमच्यासोबत उभा आहे.
जयंत पाटील म्हणाले, येणारा काळ निवडणुकांचा आहे. आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपला पक्ष फोडला आहे. काही लोकं निघून गेल्याने मागच्या रांगेतील लोकांना पुढच्या रांगेत येऊन बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुढे बसलेल्यांनी सोडून गेलेल्यांचे आभार माना. रोहित पवार विदेश दौर्यावर गेले असल्याने ते शिबीराला येऊ शकले नाहीत. ते आज रात्री शिबीराला येतील.
नवाब मलिक यांच्यावर आलेला प्रसंग आपल्याला माहिती आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागले. शाहु-फुले-आंबेडकरांचा आदर्श आम्ही मानतो. शरद पवार यांनी हेच विचार मनात बाळगले. शाहूंनी आरक्षणाची भूमिका मांडली होती. मागे पडलेल्यांना त्यांनी पुढे आणले. त्यानंतर महात्मा फुले यांनी स्त्री-पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांनी या सर्वांचे विचार एकत्र आणण्याचे काम करुन संविधानाचे योगदान दिले, असेही पाटील म्हणाले.