दिल्ली | वृत्तसंस्था
आगामी काळात सहा महिन्यांमध्ये देशात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर आठ राज्यांमधील एकूण ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, मोदी यांनी बुधवारी (२८ मे) पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, भाजपाला यंदा बंगालमध्ये मोठा विजय मिळेल. मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपा बंगालमध्ये खूप जागा जिंकेल.
नरेंद्र मोदी या प्रचारसभेत मतदारांना उद्देशून म्हणाले, तुमचं एक मत देशाची दिशा बदलू शकतं. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर सहा महिन्यांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप होईल. घराणेशाहीचं राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील. मोदींनी यावेळी नेमकं सहा महिन्यांनी काय होईल याबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. परंतु, त्यांनी बंगालमध्ये हे भाषण केल्यामुळे त्यांचा रोख ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडे असावा, असं बोललं जात आहे. तर काही राजकीय विश्लेषक याचे वेगळे अर्थ लावत आहेत.
नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांवर सातत्याने घराणेशाहीचे आरोप करत असतात. ते अधून-मधून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक), तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या पक्षांवर आणि पक्षांच्या प्रमुखांवर घराणेशाहीचे आरोप करत असतात. अशातच त्यांनी घारणेशाही असलेले पक्ष नष्ट होतील असं वक्तव्य केल्यामुळे हे वक्तव्य या सर्व पक्षांबाबत होतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.