Politics News Today:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भूयान यांच्या समोर ही सुनावणी होईल. आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावरून वाद सुरु झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट पडले. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केले. याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होईल.
लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ असे नाव दिले होते. तसेच त्यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते. शरद पवारांनी यंदाची लोकसभा निवडणूक याच चिन्हावर लढवली होती आणि आठ खासदार निवडून आणले होते. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला.
सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे निर्देश येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारीवाला माणूस हेच पक्षचिन्ह असणार आहे. तसेच शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस या चिन्हावर यापुढील निवडणूक लढवावी लागणार असून शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावे, अशी मागणी करतील असे मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी मांडले आहे.