मुंबई । नगर सहयाद्री:-
उघडीप घेतलेल्या मान्सूनची बळीराजा आतुरतेने वाट पाहत आहे. तर काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसातच पेरण्या केल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील काही भागात पुढील ३-४ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज बुधवार (दि १९) पासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसतील. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच येत्या ४८ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यापार्श्वभूमीवरआज बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तसेच मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.