मुंबई | नगर सहयाद्री
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. आजही हवामान विभागानं (IMD) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील इतर भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.मुंबईसह परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय.
काही सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज दिवसभर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढत आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभर पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलं. त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे. असं असलं तरी आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मुंबई पावसाने तुंबली
मुंबईत मुसळधार पावसाने चांगलंच थैमान घातलं असून गेल्या ६ तासांत तब्बल ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुंबईतील रस्ते जलमय झालेत. सखल भागात पाणी शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. लोकल ट्रेनला देखील या पावसाचा मोठा फटका बसलाय. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधार्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.