मुंबई । नगर सहयाद्री:-
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर आज बळीराजासाठी आनंद वार्ता समोर आली असून हवामान विभागाने आज राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांत गुरुवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती.यानुसार, मुंबईत शुक्रवारी पहाटे काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पालघर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.