मुंबई | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले असे मत देखील अजित पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांनी महाविकास आघाडीत असताना शिवसेनेचा कार्यक्रम करायला सांगितले जायचे असे म्हटले आहे. महाविकास आघाडीत आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो तेव्हा आम्हाला शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या असे सांगितले जायचे. मग मी त्यांना का असे विचारायचो? तर ते म्हणायचे की, शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घेतल्यावर अल्पसंख्यांकाना समाधान मिळते. मात्र, या निवडणुकीत अल्पसंख्यांक ठाकरे गटासोबत जायला निघाला होता. काय कुठं कसं गणित बदलंत. यावेळेस काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
पुढे अजित पवार म्हणाले, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले. देश कुठं चाललाय? जग कुठं चाललोय? आपण जातीपातीमध्ये अडकून बसला आहे. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी त्यांचा उन्माद होऊ द्यायचा नाही.
पराभव झाला तरी कोणीही खचून जायचे नाही. हे राजकारणात सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत होणार नाही. आपला कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाराज होणार नाही, अशा सन्मानजनक जागा आपल्याला नक्की मिळतील, असेही अजित पवार म्हणाले.