मुंबई । नगर सहयाद्री
पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मौसमी वारे वाहू लागल्याने मुंबईसह कोकणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तर काही ठिकाणी अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार,आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील.
विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुफान पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.