अहमदनगर | नगर सह्याद्री
१२ ते १३ जणांच्या टोळयाने घरात घुसून दोन महिलांना मारहाण करून घराचा दरवाजा व खिडया तोडून नुकसान केले. अल्पवयीन मुलीसोबत (वय १०) लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला शिवीगाळ केल्याची घटना उपनगरात घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १४) पहाटे विनयभंग, मारहाण, पोसो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर अब्दुल शेख, हर्षल उजगरे, कुनाल उजगरे, आकाश आल्हाट, अक्षय साळवे, दर्शन आल्हाट, रवी आल्हाट (सर्व रा. चोभे कॉलनी, बोल्हेगाव) व इतर पाच ते सहा अनोळखी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (दि. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिची आजी घरात झोपले असताना तिची आई व सुनील तांबे घराच्या बाहेर बोलत होते. १२:०५ वाजता आरडाओरडा झाल्याने फिर्यादी मुलीने पाहिले असता त्यांच्या घरात समीर शेख, हर्षल उजगरे, कुनाल उजगरे, आकाश आल्हाट, अक्षय साळवे, दर्शन आल्हाट, रवी आल्हाट व इतर पाच ते सहा अनोळखी घुसले होते.
त्यांनी फिर्यादीची आई व आजी यांना जुन्या भांडणाच्या कारणातून मारहाण केली. घराच्या दरवाजा व खिडयाची तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादी व त्यांच्या घरातील सर्व जण घाबरून घराबाहेर पळाले असता कुणाल उजगरे व समीर शेख यांनी फिर्यादी मुलीच्या हाताला धरून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली.
त्यानंतर टोळयाने सुनील तांबे व नीरज तांबे यांना देखील मारहाण केली.दरम्यान सदर घटनेबाबत फिर्यादी मुलीने तोफखाना पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीने त्यांच्या सोबत येऊन घडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.