अहमदनगर। नगर सहयाद्री:-
तोंडाला काळे मास्क लावून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीकडील मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा बळजबरीने काढून घेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पंपींग स्टेशन रस्त्यावर कराळे हेल्थ क्लबच्या अलिकडे ओढ्याजवळ घडली.
या प्रकरणी सारसनगरच्या चिपाड मळ्यात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने (वय १७) दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: फिर्यादी अल्पवयीन मुलगी सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रस्त्यावरील एका खासगी क्लाससाठी येत असते. बुधवारी सकाळी ती क्लासवरून कराळे हेल्थ क्लबच्या समोर राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीकडे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने तिच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली.
दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने मुलीकडे पैशाची मागणी केली. तिने पैसे नसल्याचे सांगताच त्या दोघांनी मुलीकडील मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्यासोन्याच्या रिंगा बळजबरीने काढून घेतल्या व तेथून पसार झाले. असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.