अहमदनगर। नगर सहयाद्री
द्राक्षाच्या बागेमध्ये काम करणाऱ्या मजूर महिलेला बळजबरीने ऊसाच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडली. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किशोर यणगे याला पोलिसांनी अटक केली आहे.
राहाता तालुक्यातील वाकडी परिसरात ३५ वर्षीय मजूर महिला आपल्या पती आणि ३ मुलांसह राहते. ती किशोर यणगे यांच्या शेतात काम करत होती. ८ जुलै रोजी सकाळी ती द्राक्ष बागेत गवत खुरपत होती. तिचे पती शेजारच्या द्राक्ष बागेत काम करत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती एकटीच असताना शेतमालक किशोर यणगे तेथे आला.
आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत यणगे याने महिलेचा हात पकडला व जबरदस्तीने तिला ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला. महिलेने हा प्रकार आपल्या भावाला, भावजयीला आणि आई-वडिलांना फोन करून सांगितला. नातेवाईकांसह श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.