अहमदनगर / नगर सह्याद्री –
पद्मश्रींच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज स्व. आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते. कारण शरद पवारांवर आता विस्मरणाचा होऊ लागले. यामुळे त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे. नगर जिल्ह्याचे त्यांनी कसे वाट्टोळे केले, हे त्यांना पटवून देवू असे सडेतोड उत्तर महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना दिले.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी ८ वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने मला ७ वेळा आमदार म्हणून निवडून दिले. हे पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे यश आहे. त्यांच्या संस्कारातच विखे परिवाराची अविरत वाटचाल सुरू असून सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक संधी परिवाराने जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी कारणी लावली. ज्यांनी जिल्ह्याच्या विकास कामात नेहमी अडसर निर्माण केली. जिल्ह्यातील विकासाची प्रक्रिया ज्यांना देखवत नाही, त्यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली खुली चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे. या चर्चेत पवारांनी जिल्ह्याचे कसे नुकसान केले, हे आपण त्यांना पटवून देवू असे थेट आव्हान त्यांनी पवारांना दिले. पवारांमुळे जिल्ह्याचे पाणी गेले, शेतकरी संकटात आले, जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही. त्यांचे जिल्ह्यासाठी काय योगदान आहे. एकदा तरी सांगावे असा सरळ सवाल मंत्री विखे यांनी केला. त्याच्यामुळे जिल्ह्याला किती अडचणींचा सामना करावा लागला हे त्यांना पटवून देण्याची माझी तयारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराने पोलिसांवर केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले की, ‘साध्या माणसाचा खरा चेहरा’ आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यात ६ मे रोजी विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. मागील सभेपेक्षा यावेळची सभा अधिक भव्य करण्याचे नियोजन सुरू आहे. मोदींच्या सभेमुळे कार्यकर्त्यांत नवी ऊर्जा भरली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन मतदार संघात विविध ठिकाणी करण्यात आले असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.