अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे ८ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले
.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमर्फत सुरू आहे. पोलिस प्रशासनाने या संपूर्ण घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे. यात प्रथमदर्शनी सुमारे १०५ जणांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. तर सुमारे २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
आरोपींपैकी १० जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यात संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, सीए शंकर घनश्यामदास अंदानी, बँकेचा अधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनोज वसंतलाल फिरोदिया, कर्जदार प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर, अमित वल्लभभाई पंडित यांचा समावेश आहे.
बँकेतील कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेचा गैरवापर, तसेच कर्जाच्या रकमेतून जुन्या कर्जाची रकमा भरणे, काही रक्कम संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आलेले आहे. तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी असलेल्या खात्यांमधून कर्जदारांच्या खात्यांमध्ये रकमा वर्ग झाल्याचेही तपासात समोर आलेले आहे. फॉरेन्सिक अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आलेले असून या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींच्या अटकेनंतर ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आत दोषारोप पत्र आर्थिक गुन्हे शाखेमार्फत न्यायालयात सादर करण्यात आले आहे.