पारनेर / नगर सह्याद्री
जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम शनिवारी सुटला. अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे हे संतापून दोघांमध्ये तू तू, मै मै झाली. तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो असे सांगत लाळगे यांनी संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात येत्या सोमवारी पारनेर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्या मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांना प्रशांत गायकवाड यांनी पाहुण्यांसमक्ष अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली. अखेर लाळगे यांचा संयम सुटला. तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देउन घरी निघून जातो असे सांगत लाळगे हे तिथून निघून गेले. लाळगे हे संतापल्यानंतर गायकवाड यांनी हात जोडत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र अपमानामुळे संतप्त झालेल्या लाळगे यांनी त्यांचे न एकता ते निघून गेले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून तालुक्यात त्यांची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर प्रशांत गायकवाड हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर त्यांचा रूबाब अधिकच वाढला. विशेषतः जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ते नेहमीच रूबाब करून त्यांना वारंवार अपमानीत करत. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या अजित पवार यांच्याकडे खोटया तक्रारी करून बेबानाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची ही चलाखी उघडी पडल्याने त्यांचे जिल्हाध्यक्षपद औट घटकेचे ठरले. त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून हाकालपट्टी करण्यात येऊन त्यांच्या जागेवर श्रीगोंद्याच्या बाळासाहेब नहाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
बँकेचा कार्यक्रम समजून महिला आणा!
गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांची बैठक बोलवून अजितदादांचा मेळावा हा जिल्हा बँकेचा कार्यक्रम आहे असे समजून प्रत्येक कर्मचाऱ्यांने शंभर महिलांना घेऊन येण्याचे फर्मान गायकवाड यांनी या बैठकीत सोडल्याची माहीती असून इतक्या महिलांना कसे आणणार असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
काय म्हणाले लाळगे ?
प्रत्येक वेळी तुम्ही मला अपमानीत करताय, प्रत्येक वेळी तुम्ही मला बोलताय, आतापर्यंत माझा बापही इतका बोललेला नाही. तुम्ही बोला परंतू असे अपमानीत करायचे नाही ना साहेब. मी कर्मचारी असलो तरी वेठबिगार आहे का? मीच जातो. मी राजीनामा लिहून देतो.
प्रभाकर लाळगे
तालुका विकास अधिकारी, पारनेर