पारनेर । नगर सहयाद्री-
तालुक्यातील हिवरे कोरडा येथील शेतकरी पुत्र राहुल बाबासाहेब कोरडे यांने काही तरी करून दाखवायचे या हेतूनं गाव सोडलं होत. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारत आपल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. त्यामुळे या जिद्द व चिकाटीच्या बळावर मिळालेल्या या यशाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
जिद्द असेल तर परिस्थितीला ही वाकवता येते. असणारे दिवस पलटवता येतात व स्वप्न साकार करता येते असे म्हटले जाते. पण यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राहूल कोरडे आहे. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा हा भाग तसा दुष्काळी आहे.
अनेक तरुण हे शिक्षण नोकरीसाठी स्थित्यंतर करतात. त्यातीलच एक तरुण राहुल पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न घेऊन बाहेर पडला होता. पुण्यात जाऊन त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या. घरच्यांनी दिलेली साथ आणि त्यांचा कष्टाला त्याने यश मिळून दिले.
हार न मानता यशाला गवसणी घातली व पोलीस उपनिरीक्षक या पदावर त्याने त्याचा ठसा उमटवला आहे. या यशात त्याला त्याचे आजी आजोबा वडील, आई ,भाऊ ,बहीण, यांची मोलाची साथ मिळाली. त्याच्या यशाबद्दल हिवरे कोरडेकरांनी गावात जय्यत स्वागताची तयारी करत मोठ्या आनंदात मिरवणूक देखील काढली होती.