अहमदनगर। नगर सहयाद्री
पुणे येथून बेपत्ता झालेल्या एका इंजिनिअरिंगच्या तरुणीची नगरमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयीन मित्रासह तीन जणांनी खंडणीसाठी तिचे अपहरण करून तिचा गळा दाबून तिला मारून टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. भाग्यश्री सुडे (वय – 22, मु. रा. हरंगुळ, लातूर) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.
वाघोली परिसरातील एका महाविद्यालयात सदर तरुणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेते होती. महाविद्यालयीन मित्र आणि इतर दोघांनी तिला 30 मार्च रोजी अहमदनगरमध्ये आणले होते. त्यांनंतर त्या तीन मुलांनी मुलीच्या कटुबियांकडे नऊ लाख रुपयांची खंडणीची मागणी करत भाग्यश्री हिच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले होते.
त्यानंतर त्याचदिवशी गाडीत तिचा गळा दाबून निघृण खुन केला. त्यानंतर मृतदेह सुपा गावाजवळ एका मोकळ्या जागेत पुरला. त्यानंतर तिच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतले. दरम्यान जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली. परंतु त्यांना तिथेही ती सापडली नाही, तेव्हा त्यांनी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी घटनेची गांभीर्यानी दखल घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन आरोपींवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपीना बेड्या ठोकल्या. अधिक तपास करत असतांना पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्ह्याबद्दल कबुली दिली.