spot_img
अहमदनगरसार्‍यांच्याच नाकावर टिच्चून लंके झाले खासदार

सार्‍यांच्याच नाकावर टिच्चून लंके झाले खासदार

spot_img

सारीपाट। शिवाजी शिर्के
पोरंसोरी कारभार, गावात कोणीच खात नाही, योगदान काय यासह अनेक उपमांनी खिल्ली उडवल्या गेलेल्या गावागावातील तरुणांच्या फळीला साथ मिळाली ती त्या-त्या परिसरातील लंके विरोधी नेत्यांबद्दलच्या नाराजीची! त्यातूनच पारनेर तालुक्यातून निलेश लंके यांना खासदारकीची कवाडे उघडी करणारे मोठे मताधिक्य मिळाले. तालुक्यातील जवळपास सर्वच नेत्यांची साथ विखे यांना मिळाली असतानाही प्रत्यक्षात त्याचे रुपांतर मतांमध्ये झालेच नाही.याशिवाय नगर शहरातून विखे यांना मिळणारे संभाव्य मताधिक्य घटले. श्रीगोंद्यातून मतांचे मोठी आघाडी घेतली. कर्जत- जामखेड आणि शेवगाव-पाथर्डीत विखे विरोधकांसोबतच स्वकीयांची मोट बांधण्यात यशस्वी झालेल्या निलेश लंके यांनी आपणच खर्‍या अर्थाने जायंट किलर असल्याचे दाखवून दिले. प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी सोबत असेल तर त्या-त्या तालुक्यातील कितीही मोठी नेतेमंडळी विरोधात गेली तरी विजयश्री कसा खेचून आणायचा याचा वास्तूपाठ नीलेश लंके या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याने संपूर्ण राज्याला घालून दिला. आमदारकीला लाथ मारताना अश्रू अनावर झालेल्या नीलेश लंके यांना खासदारकी पदरात पडल्यानंतर आनंदाश्रू येणे स्वाभाविकच होते.

टिवल्या- बावल्या करण्यात पटाईत काशिनाथ दाते ठरले कळीचा मुद्दा!
कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार किंवा खासदार असला तरी त्याच्या बगलेत घुसायचे आणि ठेकेदारीतून स्वार्थ साधण्याची जुनी परंपरा काशिनाथ दाते यांनी कायम ठेवली. नंदकुमार झावरे, वसंतराव झावरे आणि विजय औटी या तीनही आमदारांच्या सोबत राहून दाते यांनी ठेकेदारी केली. विजय औटी यांनी काशिनाथ दाते यांना राजकीय ताकद दिली. त्यातून त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली. आपण दुसर्‍यांना आमदार करू शकतो तर आपणच आमदार का होऊ शकत नाही, असे त्यांना मनोमन वाटू लागले. मात्र, दुसरीकडे त्यांच्या विरोधात त्यांच्या गावापासून ते संपूर्ण तालुक्यात मोठी नाराजी उभी राहत गेली. या निवडणुकीत सर्वात आधी काशिनाथ दाते हे विखेंच्या प्रचारात सक्रिय झाले. मात्र, त्यानंतर सुजित झावरे, विजय औटी, रामदास भोसले, विजू औटी अशी नेतेमंडळी विखेंच्या तंबूत दाखल होताच काशिनाथ दाते यांनी घर गाठले. आपण सांगू तसे, अशी भूमिका घ्यायला त्यांनी विखेंना टाकळीसह अन्य गटांमध्ये भाग पाडले. मात्र, विजय औटी, सुजित झावरे सक्रिय होताच आपल्या भावी आमदारकीला प्रतिस्पर्धी आल्याचे पाहून घरात बसून घेणे त्यांनी पसंत केले. सक्रिय असल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी राहुल शिंदे आणि राहुल विखे या जोडीला आईस्क्रीम खाऊ घातल्या आणि तिकडे टाकळी गटात डॉ. खिलारी यांनाही! टाकळी गटात विखे यांना मोठे मताधिक्य मिळेल असा अंदाज बांधला जात असताना प्रत्यक्षात त्या गटात वासुंदे (सुजित झावरे यांचे गाव) वगळता सर्वच गावांमध्ये नीलेश लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले. टाकळी गट म्हणजे मी आणि मी म्हणजे टाकळी गट अशी आपलची जहागीरी असल्याचे दाते दाखवत राहिले. मात्र, प्रत्यक्षात या गटातील जनतेने दाते यांनाच अस्मान दाखवले. गावागावात भांडणे लावायची आणि दोन गट निर्माण करत त्यांंच्यात वाद निर्माण करण्याची जुनी खेळी यावेळी देखील काशिनाथ दाते यांनी खेळली. त्यात त्यांनी त्यांचा स्वार्थ साधला असला तरी त्याचे परिणाम सुजय विखे यांना भोगावे लागले हे वास्तव समोर आले आहे. एका तरुणाच्या खुनाच्या प्रकरणात मुलाचे नाव आल्यानंतर आपल्या मुलाला त्यांनी त्यातून वाचवले. मात्र, त्याच मुलासोबत ज्या अन्य तरुणांची नावे पोलिसात गेली, त्या तरुणांना दोन महिने पोलिस ठाण्यात डांबून ठेवले असताना त्यांची- त्यांच्या कुटुंबाची साधी विचारपूस करण्याचे काम देखील दाते यांनी केले नाही. त्यामुळेच त्यांना या परिसरातील काही गावांमध्ये नो एंट्रीच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि त्यातूनच त्यांच्या स्वत:च्या गावात देखील विखे यांना अत्यंत कमी मते मिळाली. येणार्‍या काही काळात हेच काशिनाथ दाते हे निलेश लंके यांच्यासोबत दिसल्यास आश्चर्य वाटू नये. दाते यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जपले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लंके यांना मदत केल्याचा आरोपही मतदानानंतर सोशल मिडियावर झाला. टाकळी गटात लंके यांच्यासोबत मोठा नेता नसतानाही मिळालेले मताधिक्य लंके समर्थकांचे मनोबल वाढविणारे ठरले आहे.

पारनेरची आमदारकी कोणाला यातच समर्थकांनी केला विखेंचा घात!
सुजय विखे यांच्यासोबत राहिलो आणि ते विजयी झाल्यास मीच पारनेरचा आमदार अशा थाटात सुरुवातीला काशिनाथ दाते तालुक्यात फिरत राहिले. काही दिवसात सुजित झावरे सक्रिय झाले आणि त्यांनाही तसेच वाटू लागले. मात्र, यानंतर काशिनाथ दाते यांनी त्यांच्या गाडीला मागचा गिअर टाकला. टाकळी गटाचा मीच मालक अशा थोटात दोघांकडून दावे सुरू झाले. त्यातूनच टाकळीतील मताधिक्य मिळाल्यास त्याचे क्रेडीट कोणाला असाही प्रश्न समोर आला. त्याला आमदार व्हायचे आहे ना, मग मी कशाला पाहू! त्याची किंमत आणि जागा समजेल विखेंना, अशी दर्पोक्तीची भाषा सुरू झाली. या दोघांमधील वादात दोघांनीही टाकळी गट सोडून दिला. या दोघांमधील आमदारकीच्या स्वप्नात तिसरी उडी आली ती माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची! त्यांच्या समर्थकांकडून भावी आमदार म्हणून अनेक सभांमधून घोषणाबाजी झाली. कायम बेरकी राजकारणात पटाईत असणार्‍या काशिनाथ दाते यांनी येथेही बेरकीपणा केलाच! विजू औटी यांच्यासोबत असणार्‍या अनेक तरुणांना फोनवर त्यांनी सबुरीने घ्या, असा सल्ला दिला! हा सबुरीचा सल्ला म्हणजे काय होता ते आता निकालानंतरच्या आकडेवारीतून समोर आले आहे. यानंतर शेवटच्या टप्प्यात माजी आमदार विजय औटी यांनी विखे यांना पाठींबा दिला. यानंतर गणित जास्तच बिघडले. विजय औटी यांच्या पहिल्या मेळाव्याला हजर राहिलेल्या अनेकांना काशिनाथ दाते यांनी अक्षरक्ष: घोडे लावले! दुटप्पी भूमिका कशाला घेता, एकतर विजय औटी यांच्यासोबत राहा नाहीतर माझ्यासोबत राहा, अशी भाषाच त्यांनी वापरली. त्यातून अनेक कार्यकर्ते बिथरले! अनेकांनी दोघेही नको म्हणून लागलीच नीलेश लंके यांची साथ धरली. विजय औटी हे शांत असल्याने काहीजणांनी काशिनाथ दाते यांच्यासोबत बैठका केल्या. यानंतर हे सारे आपलेच कार्यकर्ते असल्याच्या भ्रमात दाते राहिले. औटी सक्रिय होताच त्या कार्यकर्त्यांना काशिनाथ दाते यांनी समजून घेण्याऐवजी घोडे लावण्याची गरजच नव्हती. मात्र, खोड जात नसते त्यानुसार काशिनाथ दाते यांनी ‘बोट’ घातली आणि त्याचा परिणाम विखे यांना भोगावा लागला. या चौघांच्या आधी आमदारकीची स्वप्ने पाहिली ती विश्वनाथ कोरडे यांनी! विधानसभा प्रमुख म्हणून पक्षाकडून घोषणा होताच कोरडे यांनाही आमदार झाल्यासारखे वाटू लागले. काशिनाथ दाते, सुजित झावरे, विजय औटी, विजू औटी आणि विश्वनाथ कोरडे या पाचजणांमध्ये भावी आमदारकीची स्पर्धा लागली असतानाच राहुल शिंदे यांनी सहावा नंबर लावला. आमदारकीबद्दल जाहीरपणे ते बोलले नाही. मात्र, संपूर्ण निवडणुकीत त्यांची बॉडीलाईन तीच राहिली. यासार्‍यांची कमी म्हणून की काय अजित पवार गटाचे प्रशांत गायकवाड यांची भूमिकाही यापेक्षा वेगळी दिसली नाही. लंके यांच्या विरोधात आमदारकीचा उमेदवार कोण या प्रश्नात सात- आठ जणांची नावे समोर आली आणि या सार्‍यांनी एकमेकांची जिरवण्यासाठी मतांचा टक्का वाढविण्याची जबाबदारी टाळली. ‘त्याला आमदार व्हायचंय, तो पाहील’, ही काशिनाथ दाते यांनी वाजवण्यास सुरू केलेली कॅसेट जवळपास सार्‍यांनीच वाजवली. या सार्‍यांच्या स्वत:च्या गावात विखे यांना मिळालेली मते यासाठी बोलकी आहेत.

राहुुल शिंदे- राहुल विखे यांचा पोरकटपणा नडला!
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी विखे यांनी त्यांच्या मर्जीतील राहुल शिंदे यांची निवड केली. त्यातून भाजपाचे निष्ठावान राहिलेले विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, सुनील थोरात ही मंडळी नाराज झाली. मात्र, ही नाराजी बाजूला ठेवून या सर्वांनी पक्षासाठी काम करण्याची भूमिका घेतली. त्याच्या उलट ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली असे राहुल शिंदे हे शेवटपर्यंत वेगळ्या हवेत राहिले. सुपा एमआयडीसीतील ठेकेदारीचा आरोप नीलेश लंके यांच्यावर होत असताना दुसरीकडे हेच राहुल शिंदे देखील ठेकेदारी करत राहिले. याशिवाय दर बुधवारी मंत्रालयात हजेरी लावणार्‍या याच राहुल शिंदे यांनी जनतेची कामे किती आणि बदल्यांची कामे किती केली याचीही चर्चा झालीच! स्वीय सहाय्यकांच्या इशार्‍यावर कामकाज चालविण्याचा विखे यांच्यावर संपूर्ण मतदारसंघात आरोप झाला. तोच आरोप पारनेरमध्येही कायम राहिला. राहुल विखे यांच्याकडून कोणत्याच कार्यकर्त्यांचे काम झाले नाही. कार्यकर्त्यांचे फोन घ्यायचे नाही, घेतलाच फोन तर त्यांच्याशी उद्धटपणे बोलायचे! राहुल शिंदे, काशिनाथ दाते यांच्या इशार्‍यावर खासदार- पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देण्याचे काम याच राहुल विखे यांच्याकडून झाल्याची भावना बहुतांश भाजपा आणि विखे समर्थकांमध्ये वाढीस लागली आणि त्याचा परिणामही मतदानावर झाला.

पारनेरमधील सार्‍याच विरोधी पुढार्‍यांच्या गावात लंके आघाडीवर!
नीलेश लंके यांच्या विरोधात झाडून सारे पुढारी विखे यांच्या सोबत गेले. खरेतर हा प्रयोग मागील विधानसभा निवडणुकीत विजय औटी यांच्याबाबत झाला होता. औटी यांच्यासोबत सारे पुढारी गेले. अपवाद होता नंदकुमार झावरे यांचा! सारे पुढारी सोबत असताना निकाल औटी यांच्याबाजूने लागेल असे वाटत असताना प्रत्यक्षात नीलेश लंके हे साठ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत सुजय विखे यांच्यासोबत माजी आमदार विजय औटी, रामदास भोसले, काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, बंडू रोहोकले, सचिन वराळ, दत्ता पवार, सुरेश पठारे, बाबासाहेब खिलारी, सुनील थोरात अशी दिग्गज म्हणवून घेणारी मंडळी होती. मात्र, या सार्‍यांच्याच स्वत:च्या गावात नीलेश लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले. या नेत्यांनी स्वत:चे गाव जरी सांभाळले असते तरी लंके यांचे मताधिक्य कमी झाले असते. याच्या उलट नीलेश लंके यांच्या फाटक्या समजल्या जाणार्‍या समर्थकांनी स्वत:चे गाव सांभाळताना विखे यांच्यासोबत पुढारपणात मग्न राहिलेल्या या पुढार्‍यांच्या गावावर लक्ष केंद्रीत केले. गणिमीकाव्याने लंके प्रतिष्ठान लढले आणि त्यांनी विजयश्री मिळवण्यासाठी आवश्यक असणारी मते खेचून आणली.

नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बाजी लावली आणि दिल्ली सर केली!
लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांबद्दल विखे समर्थकांकडून अनेकदा खिल्ली उडवली जात होती. मात्र, प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावली. यात प्रामुख्याने अर्जुन भालेकर, बाबासाहेब तरटे, अ‍ॅड. राहुल झावरे, पोटघन मेजर, बबलु रोहकले, दादा शिंदे, बाळासाहेब खिलारी आदींनी मोलाची भूमिका बजावली. रात्रीची यंत्रणा म्हणून प्रतिष्ठानचा आणि स्वत: लंके यांचा नामोल्लेख करत खिल्ली उडवली गेली. मात्र, यंत्रणा म्हणजे काय हे या सर्वांनी कृतीतून दाखवून दिले. आतापर्यंत जिल्ह्यातील जनतेला विखेंची यंत्रणा माहिती होती आणि तिचा अनुभव होता. आता यानिमित्ताने लंके यांची यंत्रणा कशी काम करते आणि निकाल कसा लावते हे त्यांनी दाखवून दिले व दिल्ली सर करून दाखवली.

एकनाथ शिंदे यांचा आदेश दिलीप सातपुते यांच्याकडून फाट्यावर!
महायुतीचा धर्म पाळा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी आणि शिवसैनिकांना ठणकावून सांगितले होते. मात्र, नगर शहरात तसे घडले नाही. शिंदे समर्थक असणारे सेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नापासूनच नीलेश लंके यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. मतदानाच्या दिवसापर्यंत दिलीप सातपुते हे सुजय विखे यांच्या प्रचारात फक्त शरीराने दिसत होते. त्यांचे केडगावमधील सर्व समर्थक लंके यांच्या प्रचारात आघाडीवर होते. दिलीप सातपुते हे एकटेच आणि तेही शरीराने विखे यांच्या व्यासपीठावर दिसत होते. आपण सक्रिय आहोत हे दाखविण्यासाठी ते दिवसभरातून किमान दोनदा भाजपाचे शहराध्यक्ष अभय आगरकर यांना भेटायचे! मात्र, प्रत्यक्षात हे सारे वरकरणी होते. एकनाथ शिंदे यांचा आदेश असतानाही सातपुते यांनी तो आदेश फाट्यावर मारला. नगर शहरातील आ. संग्राम जगताप, संदीप कोतकर आणि शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात त्यांनी कायम भूमिका ठेवली. या निवडणुकीत तीघेही उमेदवार नव्हते. उमेदवार होते सुजय विखे! मात्र, हे तीघेही विखे यांच्यासोबत असल्याने त्यांच्या रागातून दिलीप सातपुते व समर्थकांनी विखे यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्याचा व्हायचा तो परिणाम विखे यांना भोगावा लागला. अर्थात, एकनाथ शिंदे यांनाही आता भूमिका घ्यावी लागणार आहे.

ठाकरे शिंदे शिवसेनेचे राज्यात भांडण, नगरमध्ये निलेश लंके यांच्यासाठी गळ्यातगळे!
शिवसेना फोडल्यानंतर राज्यात दोन गट निर्माण झाले. त्यातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांची शिवसेना समोर आली. राज्यात एकमेकांशी विळ्याभोपळ्याचे सख्य असताना नगरमध्ये मात्र उलटेच घडले. ठाकरे आणि शिंदे या दोघांच्याही पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना सोबत घेण्याचे काम नीलेश लंके यांनी केले. वास्तविक निलेश लंके हेच पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि तालुकाप्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळेच त्यांचे या सर्वांशी जवळचे संबंध होतेच. शिंदे यांच्या गटात गेलेले पारनेरचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांचा अपवाद त्यात राहिला. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव यांनी दिवसाएक आणि रात्री एक अशी भूमिका घेतली. नीलेश लंके व समर्थकांनी या सार्‍यांना अत्यंत पद्धतशिरपणे हाताळले आणि त्याचे रुपांतर मतदानात झाले.

चंद्रशेखर घुले समर्थकांकडून जिल्हा बँकेचा वचपा
जिल्हा बँक चेअरमन निवडणुकीचा विषय अंतर्गत होता. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सभागृहात बसल्या- बसल्या खेळी खेळली आणि चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आणि कर्डिले हे बँकेचे अध्यक्ष झाले. कर्डिले अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर विखे यांनी कर्डिले यांचा सत्कार केला आणि त्यानंतर सातत्याने विखे यांनी कर्डिले यांचं समर्थन केले. कर्डिले यांनी अध्यक्ष झाल्यानंतर राहुरी कारखान्यासह भेंडा कारखान्याबाबत वेगळी भूमिका घेतली. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहजशक्य असताना चंदशेखर घुले अध्यक्ष म्हणून निवडून आले असते. मात्र, अंतर्गत कुरघोड्यांमध्ये कर्डिले यांनी बाजी मारली. त्यामुळे घुले नाराज झाले. त्यांची नाराजी शेवटपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीत घुले हे विखे यांच्यासोबत वरकरणी दिसले. त्यांच्याकडून विखे यांच्यासाठी खास प्रयत्न झाले नाहीत! समर्थकांना त्यांनी किती फ्री हँड दिला होता हे निकाल जाहीर होताच शेवगावमधील अनेक घुले समर्थकांच्या व्हाटसअप स्टेटसवरुन समोर आले आहे. जिल्हा बँकेतील हा वचपा काढल्याचे त्यांचे समर्थक बोलत असून यातच सारे काही आले.

शहर भाजपातील अनेकांनी पाठ फिरवली!
भाजपाच्या नगर शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात विखे यांना साथ देत असल्याचे दाखवले. मात्र, शेवटच्या आठवड्यात बहुतेकांनी पाय गाळले. नगर शहराची प्रचार आणि नियोजन यंत्रणा आ. संग्राम जगताप यांच्या ताब्यात दिल्याने ते नाराज झाल्याचे आता सांगितले जात आहे. जगताप यांना भाजपाच्या स्थानिक बहुतेकांचा विरोध असल्याने त्याचे परिणाम विखे यांना भोगावे लागले. नगर शहरातून तीस हजारांपेक्षा जास्त मतांचे लीड मिळाले असले तरी भाजपाचा हा गट अधिक सक्रिय झाला असता तर हा आकडा वाढला असता!

अजित पवार गटाच्या चंद्रशेखर घुले, राजेंद्र नागवडे, प्रशांत गायकवाड, बाळासाहेब नाहाटा आदींकडून तुतारीच!
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने सुजय विखे यांना अजित पवार गटाची जिल्ह्यात साथ मिळेल असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात नगर शहरातील आ. संग्राम जगताप यांचा अपवाद वगळता अन्यत्र बहुतांशजणांनी तुतारीला ताकद देण्याचे काम केले. विशेषत: शेवगावमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे विखे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे आकडेवारी सांगते. राजेंद्र नागवडे हे श्रीगोंद्यातील मोठं प्रस्थ! मात्र, त्यांच्या वांगदरी गावासह कारखाना कार्यक्षेत्रातील बहुतांश गावात नीलेश लंके यांचाच बोलबाला राहिला. अजित पवार समर्थक माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड हे संपूर्ण निवडणुकीत बारामतीच्या प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर असल्याचे दाखवत राहिले. त्यांच्याच गावात देखील नीलेश लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हजेरी लावली. मात्र, पारनेर आणि कर्जतमधील अजित पवार यांची सभा संपल्यानंतर स्वीच ऑफ होणेच पसंत केले. त्यांच्या लोणीव्यंकनाथ गावासह परिसरात लंके यांनी मारलेली बाजी आणि नाहाटा यांनी रात्रीच्या अंधारात केलेली कामगीरी विखे यांना दगाफटका देणारी ठरली.

विखे यांनी राजीनामा द्यावा: तरटे
पालकमंत्री असणार्‍या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वत:च्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य मिळाले आहे. याशिवाय नगर मतदारसंघात महसूल आणि पोलिस अशा सार्‍या प्रशासकीय यंत्रणा दावणीला बांधल्यागत राबवून घेतल्या. नीलेश लंके हे सामान्य कुटुंबातून आलेले असतानाही त्यांनी जनतेच्या जिवावर विखे यांना धडा शिकवला आहे. राज्याचे महसूलमंत्री असतानाही ते आपल्या मुलाचा पराभव टाळू शकले नसल्याने आणि लोखंडे यांच्यापेक्षा वाकचौरे यांना शिर्डीत मताधिक्य मिळाले असल्याने आता नैतिक जबाबदारी स्वीकारुन राधाकृष्ण विखे यांनी पालकमंत्री पदासह राज्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पारनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात खर्‍या अर्थाने जायंट किलर!
नगरसह शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यापासून ते या दोघांना विजयी करण्यापर्यंत खर्‍या अर्थाने जायंट किलरची भूमिका ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. या दोन्ही मतदारसंघात आपण स्वत: उभे असल्यागत त्यांनी लक्ष घातले. दोन्ही मतदारसंघात संगमनेरमधील विश्वासू कार्यकर्त्यांची फौज दिली. मतदान संपेपर्यंत संगमनेरची ही यंत्रणा दोन्ही मतदारसंघातील गावागावात ठाण मांडून राहिली. बाळासाहेब थोरात यांची ही मोहीम येथेच थांबली नाही. मतमोजणीसाठी देखील त्यांनी आपली यंत्रणा पोलिंग एजंट म्हणून उभी केली. शिर्डीतून वाकचौरे यांना विजयी करण्यापेक्षाही नगरमधून सुजय विखे यांना पराभूत करण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. यासाठी त्यांनी नगरमध्ये अनेकदा तळ ठोकला. लंके यांच्यावर नाराज असणार्‍यांच्या त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेठीही घेतल्या. नाराजी दूर करत नीलेश लंके यांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी अनेकांना केले. दोन्ही मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांनी करो या मरोचा नारा दिला आणि दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यात मोलाचे योगदान दिले.

लोणीत जाऊन फटाके फोडणार्‍या बबलू रोहोकले यांचे कौतुक!
नीलेश लंके यांच्यासोबत जिवाला जीव देणारी कार्यकर्त्यांची फौज असल्याचे या निवडणुकीत देखील स्पष्टपणे समोर आले. यातील अनेकजण स्वत:चे व्यवसाय आणि नोकर्‍या बाजूला ठेवून प्रचारात सक्रिय राहिले. अनेकांनी स्वत:च्या खिशात हात घातला. दुसरीकडे विखे यांच्या यंत्रणेकडे डोळे लावून बसलेले त्यांचे समर्थकही दिसून आले. कमसे कम दोन लाख मतांनी खासदार होणार असा दावा लंके समर्थक करत होते. प्रत्यक्षात तसे घडले नसले तरी विजय हा विजयच असतो. लंके यांना विजयी घोषीत केले जाताच त्यांचे भाळवणी येथील समर्थक बबलू रोहोकले व निवडक सहकार्‍यांनी थेट विखे पाटील यांचे लोणी हे गाव गाठले आणि त्या गावात जाऊन त्यांच्याच चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. बबलू रोहोकले यांच्या या धाडसाचे संपूर्ण मतदारसंघात कौतुक होत आहे.

पाडापाडीत फडणवीसांनी भाजपाचाच गेम वाजवला!
सुजय विखे यांच्या विरोधात म्हणजेच एकूणच विखे परिवाराच्या विरोधात देवेंद्र फडणवीस हे असल्याच्या चर्चा शेवटपर्यंत कायम राहिल्या. सुजय विखे यांच्यासमोर पर्याय म्हणून राम शिंदे यांचे नाव आणणे आणि राम शिंदे यांनी थेटपणे विखे यांच्यावर हल्लाबोल करणे यापाठीमागे देखील देवेंद्र फडणवीस हेच असल्याची चर्चा झडली होती. विखे परिवार थेटपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी जोडला गेल्याने देेवेंद्र फडणवीस यांची या परिवारावर खप्पा मर्जी झाल्याच्या चर्चाही झडल्या! राम शिंदे हे सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही शांत बसलेे नाहीत. राम शिंदे यांना सक्रिय करण्यासाठी थेट मुंबईत पुन्हा बैठक घ्यावी लागली यातच सारे काही आले. फडणवीसांची ज्यांच्या-ज्यांच्यावर खप्पा मर्जी झाली त्यांचा पराभव झाल्याचे यापूर्वीही आणि आताच्या लोकसभेतील निवडणुकीत राज्यातही दिसून आले आहे. मात्र, या पाडापाडीत राज्यातील भाजपाच्या जागा कमी झाल्या! याशिवाय मराठवाड्यात भाजपाचा सुपडासाफ झाला तर विदर्भात अवघ्या दोन जागा मिळाल्या. एकूणच डोईजड होऊ पाहणार्‍यांचा गेम वाजवता वाजवता फडणवीसांनी भाजपाचाच गेम वाजवल्याची चर्चा झडू लागली आहे.

आता निलेश लंके यांचा वारु कोणीच रोखू शकत नाही; पारनेरमध्ये येणारी विधानसभा लंकेच मारणार
राणीताई फिक्स आमदार!
गत विधानसभा निवडणुकीत साठ हजारांनी नीलेश लंके जिंकले होते. यावेळी लोकसभेत विजय मिळवताना त्यांना पारनेर तालुक्यातून चाळीस हजारांपेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य निर्णायक आहे. मागील विधानसभा आणि आताची लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांच्या विरोधात पारनेरमधील सारेच पुढारी उभे ठाकले होते. नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात त्यांना या दोन्ही निवडणुकीत भरभरुन साथ मिळाली. आता चार महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. या निवडणुकीसाठी त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. राणीताई लंके यांच्या विरोधातील चेहरा अद्याप समोर आला नसला तरी जी नावे सध्या चर्चेत आहेत, त्यातील कोणीही समोर आला तरी त्या उमेदवारीच्या स्पर्धेतील अन्य पुढारीच त्याचा काटा काढणार हे नक्की! म्हणजेच राणीताई लंके यांना सध्याच्या विरोधी इच्छुकांमधील सारेच मदत करतील! याशिवाय नीलेश लंके यांच्या समर्थकांना आता यशाची संपूर्ण खात्री आली आहे. लोकसभेतील विजयाने नीलेश लंके यांच्यासोबत अनेक गावातील बांधावरील मतदार आणि पदाधिकारी गेल्यास आश्चर्य वाटू नये. विरोधक एकमेकांची जिरवण्यात येणार्‍या निवडणुकीतही दंगच राहणार आहेत. त्यामुळेच राणीताई लंके या निलेश लंके यांना मिळालेल्या साठ हजारांपेक्षा जास्त मतांनी विधानसभेत निवडून येणार यात शंका राहिलेली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा...

नगरकरांना खुशखबर; आमदार संग्राम जगताप यांना नवरात्रात देवी पावली, २० कोटी मंजूर…

सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार...; खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी मंजूर अहमदनगर | नगर...

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून...

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त...