पारनेर। नगर सहयाद्री
तालुक्यातील कारेगावातील शेतकरी देवराम जेडगुले यांच्या राहत्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली असून राहत्या घरात संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाल्या आहेत.
अधिक माहीती अशी: कारेगाव येथील शेतकरी देवराम जेडगुले व घरातील सदस्य कामानिमित्त शेतात गेले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास राहत्या घराला व गोठ्याला अचानक आग लागली.
गोठ्यात दोन बैल, चार गाई यांनी मोठमोठ्याने हांबरडा फोडला आगीमुळे त्यात कोणालाच जाता न आल्याने एक बैल गंभीर जखमी होवून मृत्यमुखी पडला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
यावेळी शेतामध्ये गेलेले घरातील सदस्य व गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात आसल्याने प्रयत्न असफल झाले. घरातील सर्व गृहोपयोगी वस्तु, ५० कोंबड्या, दागिने जळुन खाक होऊन शेतकरी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती कळताच दिपक लंके, माजी सभापती काशिनाथ दाते, नंदकुमार औटी, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी भेट दिली. गावातील महसूल विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.