श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
श्रीगोंदा तालुक्यातील येवती इथं शेतात वीज कोसळल्याने न शेतकरी कुटुंबातील माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवनाथ बाजीराव आढाव (२६) व मीनाबाई बाजीराव आढाव (५०, रा. दोघेही येवती, ता. श्रीगोंदा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.
शेतकरी कुटुंबातील माय लेकरांवर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२२) सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात घडली. पावसाचे वातावरण झाले म्हणून नवनाथ व मीनाबाई हे शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले होते. पाऊस आल्यामुळे ते झाडाच्या आडोशाला थांबले होते. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर बीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
वीज एवढी भयंकर पडली की, त्या ठिकाणी लिंबाचे झाड भुईसपट झाले. मोठा आवाज आल्यामुळे शेजारील शेतकर्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या जागी जाऊन पाहिले असता मीनाबाई बाजीराव आढाव व त्यांचा मुलगा नवनाथ बाजीराव आढाव हे जागीच मृत्यू झालेले त्यांना दिसून आले. या घटनेने परिसरातून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.