नवी दिल्ली-
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज ५७ जागांसाठी मतदान पार पडत आहे. राजकीय वातावरण गरम होत असताना मतदानाला तापमानवाढीची झळ बसत आहे. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मतदानासाठी ड्युटीवर असलेल्या १८ कर्मचार्यांचा उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे. देशातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्यावर गेला आहे. दिल्लीत तर ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या १८ मतदान कर्मचार्यांचा उष्णतेशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील यामध्ये बिहारमध्ये उष्णतेमुळे १० मतदान कर्मचार्यांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला.
मिर्झापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान केंद्रावर तैनात केलेल्या तीन कर्मचार्यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
आता शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं प्रशासनाने सांगितलं. परंतु, या भागातील उष्णतेच्या लाटेमुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्येच आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, रायबरेली आणि सोनभद्र येथेही ईव्हीएम स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका अधिकार्याचा मृत्यू झाला.