जामखेड । नगर सहयाद्री
शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बटेवाडी शिवारातील कोल्हे पेट्रोल पंप जवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. बस आणि कारचा अपघात झाला असून यात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.
जामखेड कडून खर्डा कडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस ( क्रमांक एम.एच ०९ एफ.एल. १०२७ ) आणि खर्डा कडून जामखेड कडे येणारी कार ( क्रमांक एम.एच १६. ए. टी. ६४९२) या वाहनामध्ये बटेवाडी शिवारात काल रविवार दि.९ जुन रोजी अपघात झाला.
अपघातामध्ये विजय गंगाधर गव्हाणे, (वय २४ वर्षे), पंकज सुरेश तांबे, (वय २४ वर्षे), मयूर संतोष कोळी, (वय १८ वर्षे) यांचा मृत्यू झाला असून सचिन दिलीप गीते, (वय ३०) अमोल बबन डोंगरे, (वय २८) ( वडगाव गुप्ता, एमआयडीसी, अहमदनगर) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे हलवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली असून घटनस्थळी धाव घेत एसटी चालक सचिन विष्णू राऊत, ( वय ३८ वर्षे, रा. कोपरगाव ) यांना ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग वाखारे साहेब, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी भेट दिली आहे.