अहमदनगर। नगर सहयाद्री-
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रविवारी पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे हा रविवार पावसाचा ‘सुपर संडे’ ठरला आहे. जिल्ह्यात शनिवारी (दि. ८) सायंकाळी आणि रात्री अनेक भागात पावसाने हजेरी लावली तर रविवार (दि.९) रोजी नगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. ५० महसूल मंडलांमध्ये समाधानकारक, तर तीन मंडलात अतिवृष्टी झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरीराजा सुखावला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस हा विस्कळीत स्वरूपाचा होता. मात्र. मागील दोन- तीन दिवसांपासून ढगांनी जिल्हा व्यापला आहे. सर्वदूर पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. विशेषतः श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव (७१), कर्जत तालुक्यातील राशीन (७४) व भांबोरा (८२) महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे.
तसेच पारनेर तालुक्यातील सुपा, कान्हूर पठार, रांजणगाव मशीद, भोयरे गांगर्डा, तिखोल कडूस येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच टाकळी ढोकेश्वर, मांडवा, खडकवाडी येथे कमी प्रमाणात पाऊस आहे. लोणी मावळा, अळकुटी, वडझिरे परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली.
तर नेवासे तालुक्यातील कुकाणे, भेंडे परिसर, तरवडी, गेवराई, वाकडी, शिरसगाव, पिंप्रीशहाली, सुकळी, नांदूर शिकारी, वडुले, पाथरवाले, अंतरवाली, चिलेखनवाडी, देवसडे, तेलकुडगाव, देवगाव, भेंडे, शहापूर, फत्तेपूर या गावात विजांचा लखलखाट अन्मेघ गर्जना रात्रभर सुरूच होती.
तालुकानिहाय २४ तासांत झालेला पाऊस
नगर ३२.१, पारनेर ३०, श्रीगोंदे ३०, कर्जत ३०.६, जामखेड ४०.०, शेवगाव ३२.८, पाथर्डी ३४.९, नेवासे २९.१, राहुरी ३१.८, संगमनेर २७.६, अकोले ३४.३, कोपरगाव ३१.१, श्रीरामपूर ३७.९, राहाता ३६.९ मिमी पावसाची नोंद २४ तासात झाली आहे.
जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ९ जून ते १६ जून या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मुसळधा पावसाची शक्यता आहे. यापर्श्वभूमीवर सतर्कतेचा इशाराह देण्यात आला आहे.