सुनील चोभे / नगर सह्याद्री
बुऱ्हाणनगर पाणी पूरवठा योजना सुरु असूनही सोलापूर रोडवरील दरेवाडी, वाकोडी गावांना पाणी मिळत नाही. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरला जातं आहेत.त्यासाठी पाण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेचा सोलापूर रोडवरील गावांना पाणी पूरवठा तातडीने सुरु करण्यात यावा या मागणी साठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गेट वर ठिय्या आंदोलन केले.
– बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु असूनही १८ जून पासून नगर तालुक्यातील दरेवाडी वाकोडी या सोलापुर रोडवरील गावांना पाणी पुखठा झालेला नाही. योजना सुरु असुनही पाणी पुरवठा बंद आहे. सध्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरपूरकडे जातं आहेत.
काल दहिगाव, साकत येथे या गावात संत निवृतीनाथांची दिंडी मुक्कामास होती. सुमारे ५०ते ६० हजार वारकरी मुक्कामास होते. सध्या रोज तेवढेच वारकरी पंढरपूरकडे या रस्त्याने जातं आहेत. त्यांना देण्यासाठी लोकांकडे पाण्याचा थेंब नाही. तरी तातडीने कार्यवाही करून पाणी योजना सुरु करावी अशी मागणी कार्ले यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
आंदोलनामध्ये उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्यासह माजी सभापती रामदास भोर, राजू गवळी, बाळासाहेब करांडे, भगवान करांडे, अमोल तोडमल सहभागी झाले होते.