संगमनेर | नगर सह्याद्री:-
दूध उत्पादक शेतकर्याबद्दल एवढाच कळवळा असेल तर, खा.निलेश लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी असे थेट आव्हान भाजपा विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील यांच्यासह दूध उत्पादक शेतकर्यांनी केले आहे.
राज्यात महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांना पाच रुपयाचे अनुदान देण्याची योजना सुरू करून त्याची अंमलबजावणी केली. संगमनेर तालुक्यातील सुमारे २३ हजार ३०४ शेतकर्यांना १६ कोटी १५ लाख ७७ हजार २५५ रुपयांचे अनुदान खात्यात वर्ग केले आहे. एकीकडे दूधाला भाव नाही म्हणून सरकारच्या विरोधात ओरडणारे खा. लंके मात्र दूध उत्पादक शेतकर्यांना मदत करण्याचे आव्हान दुध संघ चालविणार्या माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरातांना सांगूही शकले नाहीत हे दुर्दैव आहे.
ग्राहकांना चढ्या भावाने दूध विक्री करणार्या दूध संघानी सुध्दा एक पाऊल पुढे टाकून मदत करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकारी आणि खासगी संघना दूध घालणार्या शेतकर्यांना पाच रुपये अनुदान देण्याची योजना लागू केल्यामुळेच अनुदान मिळू शकले. केवळ शेतकर्यांच्या भावनाशी खेळून त्यांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करणार्या खा. लंके यांनी दूध धंद्याचा अभ्यास करून बोलावे.
कारण संगमनेरात येवून ज्यांचे कौतुक करता त्यांनी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना आतापर्यत किती आणि कोणती मदत केली याची माहीती घ्यायला हवी. दूध संघाकडून होत असलेल्या अन्यायावर सुध्दा कधीतरी बोलावे. शेतकर्यांबद्दल आत्मियता असेल तर खा.लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी असे आव्हान दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातुन केले आहे.
प्रसिध्दी पत्रकावर दूध उत्पादक शेतकरी शंकर वाळे, राजेश भोकनळ, सीताराम पवार, नवनाथ भोकनळ, रोहिदास साबळे, कैलास जेडगुले, पुंजा डेरे, संतोष भोकनळ, गणेश पवार, माधव वाळे, निवृत्ती निकम, अजित भोकनळ, हरिभाऊ वाळे, रवींद्र वर्पे, वाल्मीक शिंदे आदी दूध उत्पादक शेतकर्यांनी सह्या केल्या आहेत.