अहमदनगर | नगर सह्याद्री
मुलबाळ होत नसल्याने छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना भिंगारमध्ये घडली. सुष्मा दीपक वैराळ (वय २५ रा. प्रबुध्दनगर, भिंगार) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाराम मारूती रोकडे (वय ४८ रा. पाटण सांगली ता. आष्टी. जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पती दीपक मच्छिंद्र वैराळ, दीर अमोल मच्छिंद्र वैराळ, गौरव मच्छिंद्र वैराळ, सासू शालनबाई मच्छिंद्र वैराळ (सर्व रा. प्रबुध्दनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सदरची घटना शनिवार (दि. २०) सायंकाळी घडली असून रविवारी (दि. २१) दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. सुष्माचा विवाह दीपक वैराळ सोबत २०२० मध्ये झाला होता. सुष्मा सासरी नांदत असताना लग्न झाल्यानंतर सुमारे दीड वर्षांनंतर ते २० एप्रिल २०२४ सायंकाळी सात वाजेपर्यंत तिचा सासरी छळ करण्यात आला.
पती व इतरांनी तुला मुलबाळ होत नाही, तु वांजोटी आहे, तुझ्यावर उपचार करण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून एक लाख रूपये घेवून ये’, असे म्हणून तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यांच्या छळाला कंटाळून सुष्माने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुष्माच्या पतीसह चौघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत.