अहमदनगर। नगर सहयाद्री-
शहरातील एमआयडीसीमध्ये वीजे अभावी उद्योजकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सबस्टेशन उभारण्याची मागणी आमी संघटनेच्या वतीने करण्यात आली. उद्योजकांच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता पाटील यांच्यासह वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठा व इतर समस्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, सुमित लोढा, पुरुषोत्तम नावंदर, राजेंद्र शुक्रे, रोहन गांधी, सचिन पाठक, चाबुकस्वार, सुबोध ख्रिस्ती, प्रवीण जुंदरे, सुमित सोनवणे, झरेकर, सतीश गवळी, शैलेश दिवटे आदी उपस्थित होते. शहरातील एमआयडीसीमध्ये मागील सहा ते सात महिन्यांपासून सातत्याने दिवसागणिक वीज पुरवठा खंडित होत असून, उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे.
वीजेच्या लपंडावामुळे सुरळीत चालू असलेले उद्योग देखील बंद पडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यात प्रामुख्याने डी, एफ, ए व एल ब्लॉक मध्ये प्रत्येक दिवशी वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे नुकसान होत आहे. तर इतर ब्लॉक मध्ये सुद्धा वीज पुरवठा खंडित होत आहे. एमआयडीसी मध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता नवीन सबस्टेशन उभारण्याची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता पाटील यांनी एमआयडीसीतील वारंवार खंडित होणारा विजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, कुठेही वीज संदर्भात त्रुटी आढळल्यास व काही अडचण निर्माण झाल्यास तातडीने कळविण्याचे त्यांनी सांगितले.