अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर महापालिकेचे नगर शहरात ३६ रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला नगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. अगोदर नगर शहरातले रस्ते दुरुस्त करा, प्रशस्त करा आणि मग पे अँड पार्क लागू करा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
पार्किंगची समस्या नगर शहरात खूपच बिकट आहे. चितळे रोड, कापड बाजार, माळीवाडा या रस्त्यावर चार चाकी वाहन लावण्यास जागा नाही. दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेले असतात. ही समस्या सोडवण्यासाठी पार्किंग साठी शुल्क आकारणे हा उपाय होऊ शकत नाही. मनपा पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खाजगी ठेकेदाराला देत आहे. याद्वारे मनपाला पाच वर्षात २१ लाख रुपये मिळणार आहे असा दावा कागदोपत्री केला जातो आहे. नगर शहर आणि सावेडी भागातील विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो होकर्स झोन लागू करून त्या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहे.
एका तासाला टू व्हीलर ला पाच रुपये आणि फोर व्हीलर ला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. नगर शहरांमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे स्थानिक गुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात. आता अधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकांकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा मनपा ने लादलेला जिझिया कर आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.
मनपाने शुल्का आकारणी करू नये, ठराव विखंडित करावे अन्यथा शिवसेना या ठेकेदाराला पार्किंग शुल्क आकारणी करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रशांत भाले, गौरव ढोणे, आनंद राठोड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.